
पुणे – वक्फ संशोधक विधेयक मुसलमानांसाठी अन्यायकारक असल्याची टीका करत २ एप्रिलला ‘वक्फ बचाव कृती समिती’ने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या वेळी मुसलमान सामाजिक कार्यकर्ते, ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’चे सदस्य, ‘जमियीत उलेमा हिंद प्रदेशा’चे कार्यकर्ते, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, समाजवादी पक्ष, आप, ‘डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चे कार्यकर्ते, ख्रिस्ती धर्मगुरु, राष्ट्रीय ईसाई महासंघ, भारत जोडो अभियान इत्यादी पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सामाजिक कार्यकर्ते अंजूम इनामदार यांनी सांगितले की, वक्फ भूमी दान करण्यात समाजाचा विकास व्हावा, अनाथ, गरीब, कष्टकरी, मुसलमान, बेरोजगार, विधवा महिलांना साहाय्य व्हावे, हा आमच्या पूर्वजांचा हेतू होता. भूमीचा कुणीही सौदा (खरेदी-विक्री) करू शकत नाही. मुसलमान समाजाची दिशाभूल करणारे हे विधेयक केंद्र सरकारने मागे घ्यावे, असे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. हे निवेदन राष्ट्रपतींकडे पाठवावे, अशी विनंती जिल्हाधिकार्यांना करण्यात आली.