क्रीडा सुविधा निर्मितीसाठी अधिकाधिक प्रस्ताव सादर करावेत ! – दत्तात्रय भरणे, क्रीडा मंत्री

दत्तात्रय भरणे

मुंबई, २७ मार्च (वार्ता.) – राज्यातील क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक साहाय्य योजनेत अधिकाधिक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात राज्य क्रीडा विकास समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी अपर मुख्य सचिव अनिल डीग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक संजय सबनीस आदी उपस्थित होते.

क्रीडा मंत्री श्री. भरणे म्हणाले की, वाढीव निधीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक क्रीडा सुविधा विकसित करण्यात येणार असून या सुविधांसाठी क्रीडामंत्र्यांद्वारे निधीचे वाटप केले जाईल, तसेच राज्यातील विविध विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलासाठी आवश्यक आर्थिक अनुदान मागणीच्या १९ प्रस्तावांना राज्य क्रीडा विकास समितीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्याचसमवेत अतिरिक्त अनुदान मागणीचे प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी संबंधित अधिकार्‍यांना केल्या.