१. मराठी लिखाणाचे हिंदीत भाषांतर करतांना कठीण मराठी शब्दांना पर्यायी शब्द आपोआप सुचणे
‘मी मराठी लेखांचे हिंदी भाषेत भाषांतर करण्याची सेवा करतो. मला काही मराठी शब्दांना पर्यायी हिंदी शब्द ठाऊक नसतात. ते शब्द शब्दकोशातही मिळत नाहीत. अशा वेळी तो शब्द मी ठळक (‘हायलाईट’) करतो आणि पुढचे भाषांतर चालू करतो; परंतु ३ – ४ ओळीनंतर मला तो शब्द कुठेतरी ऐकलेला किंवा वाचलेला लक्षात येतो, उदा. एकदा मला ‘कृष्णधवल’ या मराठी शब्दाला हिंदी शब्द आठवत नव्हता. तेव्हा पूर्वी दूरदर्शनवर प्रसारित होणार्या ‘चित्रहार’ या कार्यक्रमात एखादे जुन्या हिंदी चित्रपटाचे गाणे प्रसारित व्हायचे. त्या वेळी पडद्यावर वरच्या बाजूला ‘श्वेत-श्याम’ अशी पट्टी असायची. मला हे अकस्मात् आठवले आणि मी तो शब्द तिथे लिहिला. शेकडो शब्दांच्या संदर्भात मला असे पर्यायी शब्द सुचले आहेत. त्यामुळे माझी सेवा परिपूर्ण होण्यास साहाय्य झाले आहे. हे सर्व गुरुदेवांच्या कृपेमुळेच घडते. माझी मातृभाषा मराठी आणि शिक्षणही मराठी भाषेतून झाले आहे; पण तरीही गुरुदेव माझ्याकडून ही भाषांतराची सेवा करवून घेत आहेत. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.
२. सेवा करतांना ताण-तणावाचा विसर पडणे
मला व्यावहारिक जीवनात आर्थिक आणि कौटुंबिक असे पुष्कळ त्रास आहेत; पण हिंदी भाषांतराच्या सेवेला आरंभ करताच मला कुठलाच ताण-तणाव जाणवत नाही. सेवा संपल्यानंतर मला या त्रासांची जाणीव होते. ‘कुठल्याही प्रकारच्या तणावामुळे मी सेवा करू शकलो नाही’, असे आतापर्यंत सेवा करतांना एकदाही घडलेले नाही. ही सर्व केवळ गुरुदेवांचीच कृपा आहे.
३. भाषांतर गतीने करता येणे
माझी भाषांतर करण्याची सेवा गतीने होते. अनेकदा विभागातील साधिकांनी ‘‘तुम्ही भाषांतरासाठी ‘गूगल ट्रान्सलेट’चा उपयोग करता का ?’’ असे विचारले आहे; पण मी ‘गूगल ट्रान्सलेट’ काय असते, हे कधीही पाहिलेले नाही. मी जेव्हा सेवेला आरंभ करतो, तेव्हा ‘माझी बुद्धी आणि हातांची बोटे यांवर गुरुदेवांचे नियंत्रण असते. ‘तेच माझ्याकडून शीघ्र गतीने भाषांतराची सेवा करून घेतात’, असे मी अनेकदा अनुभवले आहे.
४. जन्मपत्रिका पाहिल्यावर ज्योतिष जाणणार्या साधिकेने ‘तुमच्या पत्रिकेत ‘आत्महत्या योग’ असून तुम्ही केवळ गुरुकृपेमुळेच जिवंत आहात’, असे सांगणे आणि प्रत्यक्षातही तसेच असणे
मला असणार्या विविध त्रासांच्या संदर्भात जाणून घेण्यासाठी एकदा मी ज्योतिष जाणणार्या सौ. प्राजक्ता जोशी यांना माझी पत्रिका दाखवली. त्यांनी पत्रिका पहाताक्षणीच ‘तुमच्या पत्रिकेतील शनि ग्रह अत्यंत दूषित असल्यामुळे तुम्हाला पुष्कळ त्रास आहेत. हा दोष एवढा प्रबळ आहे की, त्यामुळे तुमच्या पत्रिकेत स्पष्टपणे ‘आत्महत्या योग’ दिसत आहे; पण केवळ गुरुकृपेमुळेच तुम्ही जिवंत आहात’, असे सांगितले. प्रत्यक्षातही तसेच आहे.
आतापर्यंत माझ्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले आहेत, केवळ गुरुदेवांनीच मला अनेक कठीण प्रसंगांतून वाचवून माझे रक्षण केले आहे. त्यांनी केवळ माझे रक्षणच केले नाही, तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही ते माझ्याकडून सेवा करून घेत आहेत. याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. प्रसाद श्रीपाण्णावर, निपाणी, कर्नाटक. (१३.१.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |