
कोल्हापूर – कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या सभागृहाचे नाव ‘छत्रपती शिवाजी सभागृह’, असे होते आणि याच नावाची नावपाटी होती. यात सुधारणा करून ते ‘छत्रपती शिवाजी महाराज सभागृह’ करण्यात यावे’, अशी विनंती दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. अजय केळकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय तेली यांना केली. या विनंतीची तात्काळ नोंद घेत श्री. तेली यांनी या सभागृहाची नावपाटी ‘छत्रपती शिवाजी महाराज सभागृह’, अशी केली. लगेचच कृती करून नावपाटी पालटल्याविषयी शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.


या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील नावपाटीची तात्काळ नोंद घेऊन पालट करणारे कर्तव्यदक्ष आणि राष्ट्रप्रेमी अधिकारी हे इतरांसाठी आदर्शच आहेत. अशा अधिकार्यांमुळे नागरिकांच्या समस्या सुटण्यास आणि प्रशासकीय कारभार गतीमान होण्यास साहाय्यच होईल.’’
संपादकीय भूमिकाछत्रपती शिवाजी महाराज यांचा मान राखण्यासाठी प्रयत्न करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर अजय केळकर यांचे अभिनंदन ! असे कर्तव्यदक्ष पत्रकार सर्वत्र हवेत ! |