१. उत्पत्ती :‘धर्म या शब्दाची उत्पत्ती संस्कृतच्या ‘धृ’ या धातूपासून झाली आहे.
अर्थ : याचा ‘अर्थ धारण करणे किंवा धारण केले जाणे’, असा होतो.
२. व्याख्या : ‘ज्या नियमांचे पालन संपूर्ण मानवजातीसह संपूर्ण प्राणीमात्र प्रेमाने एकत्रित राहून सर्वांगीण प्रगती करू शकतील’, त्याला ‘धर्म’, असे म्हणतात. अशी सर्वसाधारण भाषेमध्ये धर्माची व्याख्या आहे.
‘यत्स्याद्धारणसंयुक्तं स धर्म इति निश्चयः ।’ (महाभारत, शान्तिपर्व, अध्याय ११०, श्लोक ११), म्हणजे ‘जर एखाद्या गोष्टीमध्ये धारण करण्याची क्षमता असेल, तर निश्चितपणे तो धर्म आहे.’
‘यतोऽभ्युदयनिःश्रेयससिद्धिः स धर्मः ।’ (वैशेषिक दर्शन, अध्याय १, आह्निक १, सूत्र ३), म्हणजे ‘ज्या योगाने आपला अभ्युदय होऊन आपल्याला निश्चितपणे मोक्षप्राप्ती होते, तो धर्म होय.’
धर्माचा मूळ आधार सर्व शक्तीमान आणि सर्व व्याप्त असणारा परमेश्वर आहे. सर्व प्राणीमात्रांच्या अंत:करणात परमात्मा आहे, तो सर्वत्र आहे. म्हणून धर्माची विभागणी न करता ‘सर्व मनुष्य आणि जीव-जंतू एकाच पित्याचे पुत्र आहेत’, असे मानून सर्वांच्यात त्याच परमपिता ईश्वराचे दर्शन करवतो.
विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ५, श्लोक १८
अर्थ : ते ज्ञानी पुरुष विद्या आणि विनय यांनी युक्त असलेल्या ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पहातात.
– डॉ. श्रीलाल, संपादक
(साभार : मासिक ‘गीता स्वाध्याय’)