Court Notice On So Called Jama Masjid : संभल (उत्तरप्रदेश) येथील शाही जामा मशीद ‘कथित मशीद’ !

हिंदु पक्षाचे अधिवक्ता पू. हरि शंकर जैन यांच्या आक्षेपानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेशात उल्लेख

हिंदु पक्षाचे अधिवक्ता पू. हरि शंकर जैन

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – संभल येथील शाही जामा मशीद पूर्वीचे श्री हरिहर मंदिर असल्याच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला मशिदीला भेट देण्याचे आणि रमझानपूर्वी किती रंगकाम करणे आवश्यक आहे, ते पहाण्याचे आदेश दिले. पुरातत्व विभागाने संरक्षणाची मागणी केली; परंतु न्यायालयाने ती फेटाळून लावत ती आवश्यक नसल्याचे सांगितले. हिंदु पक्षाचे अधिवक्ता पू. हरि शंकर जैन यांनी सांगितले, ‘रंगकाम करण्याच्या निमित्ताने मशिदीत असलेले हिंदु चिन्हे पुसून टाकली जाऊ शकतात. न्यायालयाने या वास्तूला केवळ मशीद मानू नये.’ त्यानंतर न्यायालयाने आदेशात ‘कथित मशीद’ असे लिहिले. तसेच ‘हिंदु प्रतीकांना धोका पोचवणार नाही’, असे आश्वासन दिले.

पुरातत्व विभागाचे पथक उद्या, २८ फेब्रुवारीला मशिदीची तपासणी करून न्यायालयाला अहवाल सादर करणार आहे. मशिदीच्या व्यवस्थापन समितीच्या अर्जावर न्यायालयाने हा आदेश दिला. १ मार्चपासून चालू होणार्‍या रमझाननिमित्त मशिदीत रंगकाम आणि इतर काम करावे, अशी समितीची इच्छा होती; परंतु पोलीस आणि पुरातत्व विभाग यांनी याला विरोध केला होता.

न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, रमझानच्या काळात धार्मिक सलोखा राखला पाहिजे आणि दोन्ही पक्षांचे हित जपले पाहिजे.