ज्ञानप्राप्तीपेक्षा साधना करणेच महत्त्वाचे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मला प्रारंभीपासूनच अध्यात्मशास्त्राबद्दल जिज्ञासा होती. मी प्रथम संतांना प्रश्न विचारून ज्ञान प्राप्त करू लागलो. त्यानंतर मी साधना करू लागल्यावर मला सूक्ष्मातून ज्ञान मिळू लागले. मग मी माझ्या प्रश्नांची उत्तरे त्या माध्यमातून मिळवू लागलो. कालांतराने सनातनच्या साधकांना ज्ञान मिळू लागल्यावर मी माझ्या प्रश्नांची उत्तरे त्या साधकांच्या माध्यमातून मिळवू लागलो. मिळालेल्या ज्ञानावर परत काही प्रश्न विचारू लागलो. त्यामुळे पुष्कळ वरच्या स्तराचे ज्ञान मिळू लागले. ही प्रक्रिया गेले २० वर्षे निरंतर चालू आहे. मी हे सर्व समाजाला अध्यात्मशास्त्राचे महत्त्व सांगता यावे, यासाठी करत आलो.

प्रत्यक्षात ‘अध्यात्मशास्त्र हे अनंताचे शास्त्र आहे. त्याच्या संदर्भात कितीही ज्ञान मिळवले, तरी अपुरेच असणार. ईश्वरप्राप्तीसाठी या ज्ञानाचा काही अंशीच उपयोग होत असतो. त्यासाठी प्रत्यक्ष साधना करणेच आवश्यक असते.’, हे प्रत्येक साधकाने लक्षात घ्यावे !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (८.१२.२०२४)