सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

श्री. पुष्कर अरगडे : काही वेळा सेवेमध्ये पुष्कळ अडचणी येतात. त्या अशा असतात की, मी काही केले, तरी काही लाभ होत नाही. त्या वेळी माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार येतात, ‘मी सेवा करतो आणि माझ्या सेवेतच अडचणी येतात.’ त्या वेळी मला मन स्थिर ठेवता येत नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आपल्याला अडचणी आल्यावर आपल्याकडून अशी प्रतिक्रिया व्यक्त व्हायला पाहिजे, ‘मला आता नवीन शिकायला मिळाले !’ त्या अडचणींवर दुःख करत बसायचे नाही. ज्याला त्याविषयी ठाऊक असते, त्याला विचारायचे. त्याने सांगितले की, आपण नवीन शिकलो. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. अध्यात्मात कितीतरी विषय आहेत आणि स्थुलातील विषयही आहेत. तुम्ही जी काही सेवा करता, त्या सेवेतही पुष्कळ विषय आहेत. अडचणी पुष्कळ आल्या, तरी आपण त्यातून मार्ग काढून ते शिकण्यातून आनंद मिळवायचा. ‘आपल्याला येते कि नाही ?’, असा विचार करायचा नाही. आता आम्हीसुद्धा काय करतो ? अजूनही सूक्ष्मातील प्रश्न आला, तर सूक्ष्मातून देवालाच विचारतो. सर्वज्ञता आलेलीच नसते. ‘मला विचारावे लागते’, याचे दुःख नाही. ‘विचारून त्याचे उत्तर मिळते !’, याचा आनंद आहे.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |