देहली येथे आज समाप्त होत असलेल्या ९८ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या निमित्ताने…
‘हुतात्मा’, ‘महापौर’, ‘त्रिमितीपट’, अशा अनेक शब्दांची देण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी आपल्याला दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवरायांना त्यांचा आदर्शच नाही, तर दैवत मानले. त्यामुळे राजांच्या अनेक धोरणांचा, योजनांचा प्रभाव सावरकर यांच्या कार्यप्रणालीवर दिसून येतो. त्या दोघांच्याही आयुष्यात अनेक साम्यस्थळे आहेत, त्यातील एक म्हणजे भाषाशुद्धी !
१. परकीय आक्रमकांमुळे मराठीसह हिंदु भाषांवर परिणाम होणे

परकीय आक्रमण हा केवळ देश स्वातंत्र्यावर घाला नसतो, तर घाला असतो त्या देशाच्या संस्कृतीवर, भाषेवर ! किंबहुना पहिला घाव भाषेवर घालून संस्कृती नष्ट करण्याचा आक्रमकांचा प्रयत्न असतो. आपल्या देशावर मोगल, ब्रिटीश आणि इतर आक्रमक यांनी मिळून अनुमाने १२०० वर्षे राज्य केले. या आक्रमकांमुळे केवळ मराठी भाषाच विद्रूप झाली, असे नाही, तर हिंदुस्थानातील इतर हिंदु भाषांवरही परिणाम झाला.
मराठी भाषेवरील उर्दू, पर्शियन भाषांचे आक्रमण ओळखून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांनी रघुनाथ पंडित यांच्याकडून राज्यभाषा व्यवहारकोश करवून घेतला. राजांनी संस्कृत भाषेच्या अभ्यासासही प्रोत्साहन दिले. याचा प्रभाव पेशवाईपर्यंत टिकला. पेशवाईत कवी मोरोपंत यांनी शुद्ध मराठीत अतिशय सुंदर काव्यरचना केल्या. तरीसुद्धा मराठी भाषेत घुसलेले काही परकीय शब्द तसेच राहून गेले.
२. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे भाषाशुद्धीचे कार्य स्वतांत्र्यवीर सावरकर यांनी पुढे चालू करणे
पुढे ब्रिटिशांचे राज्य आले आणि भारतियांना इंग्रजी भाषेचे शिक्षण मिळू लागले, त्यामुळे नोकर्या मिळू लागल्या. ब्रिटिशांच्या बुद्धीभेद करण्याच्या डावात आपण अडकलो. आपल्यातीलच अनेकांना इंग्रजी राज्य, भाषा, साहित्य उच्च प्रतीचे वाटू लागले. आपली मराठी भाषा, आपले साहित्य कमी मोलाचे वाटू लागले. त्याच वेळी संस्कृत, मराठी ग्रंथांप्रमाणेच इंग्रजीचाही अभ्यास असणारे निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी भाषाशुद्धीचे महत्कार्य हाती घेतले. त्यामुळे ते ‘आधुनिक मराठी भाषेचे जनक’, ‘मराठी भाषेचे शिवाजी’ म्हणून प्रसिद्ध पावले; पण त्यांना अवघे ३२ वर्षांचे आयुष्य लाभल्यामुळे मराठी भाषाशुद्धी चळवळीची मोठीच हानी झाली. त्यानंतर भाषाशुद्धीची चळवळ हाती घेतली ती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ! ते त्या वेळी रत्नागिरीत स्थानबद्धतेत होते. ‘राजकारणात भाग घेता येणार नाही, तर समाजकारण करीन’, या भूमिकेतून अंधश्रद्धा, अस्पृश्यता निर्मूलन, स्वदेशीचा पुरस्कार यासह त्यांनी हाती घेतली भाषाशुद्धी चळवळ ! भाषांमध्ये घुसलेल्या उर्दू, पर्शियन, इंग्रजी शब्दांमुळे केवळ मराठी, हिंदीच नव्हे, तर बंगाली, गुरुमुखी अशा सगळ्याच हिंदु भाषा विद्रूप होत होत्या.
३. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘भाषाशुद्धी’विषयी केलेले विविधांगी कार्य

३ अ. दैनिक ‘केसरी’मधून ‘भाषाशुद्धी’विषयीची लेखमाला : वर्ष १९२५ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दैनिक ‘केसरी’मध्ये ‘भाषाशुद्धी’ या विषयावर लेखमाला लिहिली. त्यामुळे मराठी साहित्य विश्वात बरीच खळबळ माजली. अनेकांनी या चळवळीला कडाडून विरोध केला. अनेक आक्षेप नोंदवण्यात आले. त्या आक्षेपांना उत्तरे देणारे सावरकर यांचे लेख, वर्ष १९२६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘मराठी भाषेचे शुद्धीकरण’ या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आले. सावरकर यांचे हे लेख १०० वर्षांपूर्वीचे आहेत; पण आजही मराठी भाषेची परिस्थिती तशीच आहे, किंबहुना ती अधिकच केविलवाणी होत चालली आहे. दुकानांवरील पाट्यांवर इंग्रजीत लिहिलेल्या शब्दांविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्या लेखात आक्षेप नोंदवला आहे आणि आजही दुकानांवरील पाट्या मराठीत लिहिल्या जाव्यात, यासाठी आंदोलन करावे लागत आहे. ‘आज मॉर्निंगला वाईफला फिव्हर चढला होता, तरी तसाच स्टीमरने फर्स्ट क्लासचे तिकीट काढून बाँबेला आलो’, अशी भयावह मराठी भाषा बोलणार्यांची उदाहरणे सावरकर यांनी दिली आहेत. आजही परिस्थिती पालटलेली नाही, उलट बिघडलेलीच आहे.
मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी नोंदवलेल्या आक्षेपांना उत्तरे देणारा सावरकर यांचा लेख १६ जून १९२६ या दिवशीच्या ‘श्रद्धानंद’ साप्ताहिकात प्रसिद्ध झाला. पुढे कोल्हटकरांनीही विदेशी शब्दांविरुद्धच्या या चळवळीमुळे परकीय शब्दांच्या वापराला ओहोटी लागल्याचे मान्य केले.
३ आ. भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी चळवळीचे मुखपत्र म्हणजे साप्ताहिक ‘श्रद्धानंद’ ! : सावरकर यांनी ‘कायदे कौन्सिल’मधील ‘इलेक्शन कँडिडेटांचे मॅनीफेस्टोज’ (निवडणुकीतील उमेदवारांचे घोषणापत्र) या १९२६ मध्ये लिहिलेल्या विनोदी लेखात योजलेले विधीमंडळ, विधानसभा, विधायक, इच्छुक, निवडणूक, घोषणापत्र, असे अनेक शब्द आज प्रचलित झाले आहेत. ‘श्रद्धानंद’ हे सावरकर बंधूंचे साप्ताहिक भाषाशुद्धी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीच चालू केलेल्या लिपीशुद्धी चळवळीचे मुखपत्र होते. भाषाशुद्धी चळवळीला ५ वर्षे झाल्यानंतर सावरकर यांनी ‘पंचवार्षिक समालोचन’ या लेखात चळवळीचा आढावा घेतला आणि पाचलेगावकर महाराज, मसूरच्या ब्रह्मचर्याश्रमासारखी संस्था, त्यांचे ‘दासबोध’ हे मासिक, ‘ज्ञानदेवी’ मासिकाचे संपादक आठवले, लिपी संशोधक देवधर अशा अनेकांचा भाषाशुद्धीचे अभिमानी म्हणून विशेष उल्लेख केला. ‘सर्वांनीच विदेशी शब्द बहिष्काराचे हे व्रत चिकाटीने आणि निर्धाराने चालवावे’, असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या व्याख्यानांतून, प्रत्यक्ष भेटीगाठींमधून ते भाषाशुद्धीचा प्रचार करतच होते.
३ इ. ‘उर्दूनिष्ठ हिंदुस्थानी’ ही राष्ट्रभाषा आणि उर्दू लिपी ही राष्ट्रलिपी करण्याच्या काँग्रेसच्या चाललेल्या प्रयत्नांविषयी वर्ष १९५१ मध्ये ‘आमची राष्ट्रभाषा आणि भाषाशुद्धी’ हा लेख त्यांनी लिहिला. ‘प्रचारासाठी डॉ. रघुवीर यांच्याप्रमाणे सहस्रो कार्यकर्ते निर्माण झाले, तर ५-१० वर्षांत ‘संस्कृतनिष्ठ हिंदीच आपली राष्ट्रभाषा कशी होत नाही, ते बघू !’, असा प्रखर आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.
४. मराठी वा अन्य भाषेत शब्द पाहिजे असल्यास संस्कृतचा संदर्भ घेण्यासाठी सावरकर यांचे बोल
‘आम्ही जे परकीय शब्द आत्मसात् केले नि पचवले, ती आहेत आमची विजय चिन्हे’, असेही म्हटले जात असतांना सावरकर जीव तोडून सांगत होते, ‘ती आमची विजय चिन्हे नाहीत, तर ते आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत.’ सावरकर यांचे सांगणे होते की, आपल्याला मराठीत नि कोणत्याही हिंदु भाषेत जर एखादा शब्द लागला, तर तो संस्कृतोद्भव घ्यावा किंवा आपल्या इतर कुठल्याही भाषेतून घ्यावा, बोलीभाषेतून घ्यावा; कारण त्या सर्व भाषा भगिनीच आहेत; पण शक्यतोवर परकीय शब्द वापरू नयेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात, ‘ज्या वस्तू किंवा संकल्पना आपल्याकडे अस्तित्वातच नव्हत्या आणि त्याला जुने वा नवे शब्दच नाहीत, तेव्हा परकीय शब्द सुखनैव राहू द्यावे. उदाहरणार्थ खुर्ची, टेबल, बूट, मेज, सदरा, कोट, जाकीट, ट्रंक, कॉलर इत्यादी. चप्पल, खडावा, वाहणा असे शब्द असतांनाही पादत्राणाचा वेगळा प्रकार म्हणून ‘बूट’ शब्द वापरायला हरकत नाही; पण जोडा, पादत्राण, पायताण असे शब्द असतांना ‘शू’ शब्द वापरण्याची आवश्यकता नाही’, असे ते सांगतात.
५. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषाशुद्धीसाठी केलेल्या अविश्रांत परिश्रमांचे यश
सावरकर यांच्या भाषाशुद्धी चळवळीला विरोध करणार्यांमध्ये कवी माधव ज्युलियन होते. त्यांच्या कवितेत मोठ्या प्रमाणावर फारसी शब्द असत. पुढे त्यांचा विरोध मावळला आणि ते सावरकर यांच्या भाषाशुद्धी चळवळीचे पुरस्कर्ते बनले. इतकेच नव्हे, तर त्यांनी आपल्या सार्या कविता पुन्हा शुद्ध मराठीत लिहून काढल्या, ‘भाषाशुद्धी- विवेक’ हे पुस्तक लिहिले; उर्दू, फारशी शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द असलेले शब्दकोश प्रसिद्ध केले. सावरकर यांनी भाषाशुद्धीसाठी केलेल्या अविश्रांत परिश्रमांचे हे यश होते, अनेक नवे शब्द जन्माला येऊ लागले होते, जुने रुळू लागले होते.
६. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुचवलेले मराठी शब्द
स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांच्या तावडीतून पूर्णपणे मुक्त झाल्यावर त्यांनी कोल्हापूरच्या ‘हंस पिक्चर्स’ला भेट दिली. तिथे सगळ्या पाट्या इंग्रजीत असलेल्या पाहून सावरकर अस्वस्थ झाले आणि त्यांनी बाबूराव पेंढारकर यांना मराठी पाट्या लावण्यास सुचवले. पेंढारकर म्हणाले, ‘मराठी शब्द सुचवावे, त्वरित पाट्या पालटतो.’ सावरकर यांनी तिथल्या तिथे शब्द सुचवले. तो दिवस होता २० जून १९३७ ! याच दिवशी जन्म झाला – चित्रपट, बोलपट, दिग्दर्शक, कलागृह, कलामंदिर, छायाचित्रण, बाह्यचित्रण, ध्वनीलेखन अशा शब्दांचा ! त्याचप्रमाणे बोलता बोलताच नू.म.वि. हायस्कूलची झाली, नू.म.वि. प्रशाला. सांगलीच्या ‘गजानन मिल’चे मालक श्री. वेलणकर झाले, धनी वेलणकर. प्रिन्सिपल अत्रे झाले, आचार्य अत्रे. पुण्याचे मेयर गणपतराव नलावडे झाले, महापौर गणपतराव नलावडे !
– सौ. मंजिरी मराठे, कोषाध्यक्षा, सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई. (साभार : दैनिक ‘सकाळ’, वर्धापनदिन विशेषांक, १३ फेब्रुवारी २०२५)
भाषाशुद्धीसाठी स्वदेश, स्वधर्म अन् स्वभाषा यांविषयीचा अभिमान बाळगणे महत्त्वाचे !
मराठी भाषेला आता ‘अभिजात (समृद्ध) भाषा’ म्हणून मान्यता मिळाली आहे. ‘सर्व काही भेटण्याच्या’ आजच्या काळात आपल्या भाषेचे सौंदर्य टिकवून ठेवायचे असेल, तर प्रत्येक मराठी माणसाने शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न करायला हवा. ते शुद्धत्व टिकवायचे असेल, तर ‘ब्राह्मणी भाषाच का प्रमाण मानायची ?’, हा द्वेष सोडून जाणूनबुजून इंग्रजी शब्द वापरणे बंद करायला हवे. वर्तमानपत्र, वाहिन्या, लेखक, कवी सर्वांनीच विदेशी शब्द वापरणे थांबवायला हवे. श्री शिवछत्रपती, मोरोपंत, विष्णुशास्त्री चिपळूणकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, माधव ज्युलियन आणि पुढेही अनेकांनी घेतलेले भाषाशुद्धीचे व्रत यापुढेही नेटाने चालवायचे असेल, तर ‘मम्मी, पप्पांना’, लहानग्यांचे ‘आई-वडील’ होऊन त्यांच्यात स्वदेश, स्वधर्म अन् स्वभाषा यांविषयीचा अभिमान बालपणापासूनच जागृत करावा लागेल. भाषा टिकली, तरच आपली संस्कृती टिकणार आहे !
– सौ. मंजिरी मराठे