रामनाथी आश्रमातील साधिका सुश्री सोनल जोशी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४४ वर्षे) यांना जाणवलेली सौ. मुग्धा मणेरीकर (पूर्वाश्रमीची कु. श्रावणी पेठकर) यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. लहान वयात मायेपासून अलिप्त होऊन साधनेसाठी आश्रमात येणे
‘श्रावणी लहान वयात सनातनच्या आश्रमात पूर्णकालीन साधना करण्यास आली. ज्या वयात तरुण-तरुणींना मायेची ओढ असते, ‘बाहेर फिरावे, मौजमजा करावी’, असे वाटत असते, त्या वयात ती सर्व सोडून, म्हणजे घरदार आणि आई-वडील यांना सोडून साधनेसाठी आश्रमात आली.

२. सेवेची तळमळ
२ अ. नेतृत्व गुण आणि प्रगल्भ बुद्धी असल्याने अनेक सेवांचे दायित्व घेणे : श्रावणीला एखादी सेवा दिल्यावर ती त्या सेवेचा नीट अभ्यास करायची. ती सेवा नीट समजून घ्यायची आणि दायित्व असणार्या साधकांनाही विचारून घ्यायची. तिच्यामध्ये नेतृत्वगुण असल्यामुळे मला जतनसंबंधी सेवांचा समन्वय करतांना पुष्कळ साहाय्य होत होते. श्रावणी वयाने लहान असूनही तिची बुद्धी प्रगल्भ आहे. त्यामुळे तिने काही वर्षांतच काही सेवांचे दायित्व घेतले. सेवेसाठी कितीही श्रम करण्याची श्रावणीची सिद्धता असायची. कधी शारीरिक त्रास झाले, तरी तिने कधीच कोणत्याही महत्त्वाच्या सेवेला ‘नाही’, म्हटले नाही. कठीण वाटणार्या सेवाही तिने अल्प वेळेत समजून घेतल्या. तिच्यात ऐकण्याची आणि शिकण्याची वृत्तीही आहे.
२ आ. परिपूर्ण सेवा करणे : ‘देवाला अपेक्षित अशी सेवा कशी करता येईल ?’, यासाठी श्रावणीची धडपड असायची. त्यामुळे श्रावणी जिद्दीने सेवा करायची. ती नुसती सेवा करत नसे, तर ‘इतरांना आपल्याकडून कशी सेवा करणे अपेक्षित आहे ?’, याचा विचार करून ती सेवा करत असे. ती सेवेचा अभ्यास परिपूर्ण रीतीने करत असे. त्यामुळे तिच्या सेवेत अल्प चुका असायच्या.

२ इ. साधकांशी जवळीक साधणे : श्रावणी स्वतःच्या हसतमुख स्वभावाने सहसाधकांना अत्यंत चांगल्या प्रकारे सांभाळायची. ‘साधकांना कठीण परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे कसे सांगू शकतो ? त्यांच्याकडून कशी सेवा करून घेऊ शकतो ?’, हे श्रावणीने शिकून घेतले होते. सहसाधकांकडून सेवा चांगली होण्यासाठी ती त्यांना साहाय्य करत असे. त्यामुळे साधकांना तिच्याविषयी जवळीक वाटायची.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
सेवा करतांना तिच्यामध्ये गुरूंप्रती भाव जाणवायचा. ‘आश्रमातील प्रत्येक वस्तू परम पूज्य डॉक्टरांची आहे आणि ती नीट सांभाळायला पाहिजे’, असा तिचा भाव असायचा. त्यामुळे ती प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक आणि चांगल्या प्रकारे हाताळायची.
स्वतःला घडवण्याची तळमळ आणि साधनेचा ध्यास असल्यास ‘भगवंत कसे साहाय्य करतो आणि साधनेत पुढे घेऊन जातो’, हे श्रावणीच्या उदाहरणावरून मला शिकायला मिळाले. ‘गुरुमाऊली, तुम्ही आम्हाला श्रावणीसारखी साधिका दिली आणि मला तिच्याकडून हे सर्व शिकता आले; म्हणून तुमच्या कोमल चरणी पुष्कळ कृतज्ञता !’
– सुश्री (कु.) सोनल जोशी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१२.२०२४)