कीर्तन शिक्षणाची आवश्‍यकता !

(कै.) धर्मदास नरेंद्रबुवा हाटे

‘मनुष्‍य विद्वान असला, तरी तो उत्तम कीर्तनकार होऊ शकेल, असे नाही. कीर्तनात संहिता, सादर करण्‍याची पद्धत ही फार महत्त्वाची आहे. कीर्तन ही कला आहे आणि म्हणूनच ती शिकणे आवश्यक आहे, तसेच चांगले कीर्तनकार उत्पन्न होण्यासाठी या कलेच्या अध्यापनाचीही आवश्यकता आहे. पूर्वी कीर्तनकार आपल्या पदरी विद्यार्थ्यांना ठेवून त्यांना शिकवत असत. त्यातून त्‍या कीर्‍तनकाराचा नमुना त्या विद्‍यार्थ्यामध्ये काही प्रमाणात उतरत असे. अशा प्रकारे डॉ. पटवर्धन, ह.भ.प. कर्‍हाडकरबुवा, ह.भ.प. रामचंद्रबुवा शिरवळकर, ह.भ.प. शंकरशास्त्री भिलवडीकर, ह.भ.प. नानाबुवा बडोदेकर, ह.भ.प. निजामपूरकर इत्यादी अनेक कीर्तनकारांनी त्यांचे शिष्य सिद्ध केले.

कालमानानुसार घरात विद्यार्थ्‍यांना सांभाळणे, स्‍वतःसमवेत प्रवासात नेणे, त्‍यांचा सर्व व्‍यय करणे कठीण होत गेले. याखेरीज तसे समर्पित विद्यार्थी मिळणे आणि त्‍यांचा सांभाळ करायला कुटुंबीय अन्‍य मंडळींचे सहकार्य मिळणे दुरापास्‍त झाले. त्‍यातून कीर्तन विद्यार्थ्‍यांची आवश्यकता उत्पन्न झाली. पुण्याच्या ‘हरिकीर्तनोत्तेजक सभा’ आणि मुंबईच्या ‘अखिल भारतीय कीर्तन संस्था’ यांनी आजपर्यंत शेकडो कीर्तनकार सिद्ध केले. पुण्याच्‍या ‘कीर्तन महाविद्यालयाने’ही बरेच विद्यार्थी शिकवून कीर्तन क्षेत्रात सोडले. आज कीर्तन अध्‍यापनासह कीर्तनविषयक पाठ्यपुस्‍तके किंवा कीर्तनोपयोगी साहित्‍य, लिखाण पूर्वीच्‍या कीर्तनकारांच्‍या संहिता प्रकाशित होणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचे उत्तम कार्य होऊ शकते.

– (कै.) धर्मदास नरेंद्रबुवा हाटे, मुंबई

(साभार : ‘अखिल भारतीय कीर्तन संमेलन स्‍मरणिका’, वर्ष १९८९)