शिक्षण विभागाने घटना अस्वीकारार्ह असल्याचे केले मान्य
जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) – दक्षिण आफ्रिकेतील क्वाझुलु-नताल प्रांतातील ड्रेकेन्सबर्ग माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने एका हिंदु विद्यार्थ्याच्या मनगटावर बांधण्यात आलेला पवित्र धागा कापल्याची घटना घडली. शाळेकडून सांस्कृतिक आणि धार्मिक चिन्हे घालण्यास बंदी असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेनंतर दक्षिण आफ्रिकेतील हिंदु महासभेने शिक्षण अधिकार्यांकडून कारवाईची मागणी केली आहे.
१. हिंदु महासभेने म्हटले आहे की, आम्ही शाळेतील धार्मिक असहिष्णुतेच्या घटनेची चौकशी करत आहोत; परंतु ज्या विद्यार्थ्यासमवेत ही घटना घडली, तो समोर येण्यास घाबरत असल्याने तपासात अडथळा येत आहे. शाळेत झालेल्या छळामुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागला आहे.
२. क्वाझुलु-नतालमधील प्रांतीय शिक्षण विभागाचे प्रवक्ते मुझी महलाम्बी म्हणाले की, राज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे आणि त्याच्या विरोधात असलेले कोणतेही शालेय धोरण अस्वीकारार्ह आहे, याचा शिक्षण विभाग आग्रह धरतो. कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या धार्मिक संलग्नतेसाठी शिक्षा होऊ नये.