आपण कुंभमेळा पूर्वीपेक्षा अधिक यशस्‍वी करून जगापुढे एक आदर्श ठेवूया ! 

प्रयागराज येथील कुंभमेळ्‍यात आज ‘अमृत स्नान’ आहे. त्‍या निमित्ताने…

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

पर्वकाळाचा मुख्‍य उद्देश आहे, तो गंगास्नान करून देवसमुहाने आपल्‍यावर केलेल्‍या उपकारांविषयी कृतज्ञता व्‍यक्‍त करणे; पण हा हेतू साध्‍य होतो का ? गंगास्नान हे केव्‍हाही पुण्‍यकारकच आहे. प्रत्‍येकाचे स्‍वतःचे कर्तव्‍य आहे की, आपल्‍या सभोवतालचा परिसर स्‍वच्‍छ ठेवणे. हा परिसर म्‍हणजे लोकवरदायिनी गंगेचा परिसर ! तो स्‍वच्‍छ ठेवायलाच हवा ! आपल्‍या पवित्र नद्या, मंदिरे आणि त्‍यांचा सभोवताली परिसर स्‍वच्‍छ ठेवणे, हे भक्‍त असल्‍याचे लक्षण आहे. आपण काहीही अन्‍नग्रहण केले, तर उच्‍छिष्‍ट महापालिकेने ठेवलेल्‍या कचरापेटीत टाकावयास हवे. देहधर्म ठराविक ठिकाणीच करावयास हवे. ज्‍या ठिकाणी, ज्‍या शहरात कुंभमेळा भरतो, त्‍या संपूर्ण शहराचीच कचरापेटी करणे, आपल्‍या अंतरंगातील भक्‍तीला आणि श्रद्धेला शोभते का ? क्षणभर आपण आपले हे दायित्‍व बाजूला ठेवून दुसरा विचार करूया. आपल्‍या घरामध्‍ये कचरा असेल आणि कुणी त्‍या वेळी घरात आले, तर आपल्‍याला ओशाळे वाटणार नाही का ? किंवा असाही विचार करा की, आपण कुणाच्‍या घरी गेलो आणि त्‍या ठिकाणी अव्‍यवस्‍था अन् कचर्‍याचे साम्राज्‍य आहे, तर त्‍या ठिकाणी थांबणे आपल्‍याला आवडेल का ? मग आपण अशी अपेक्षा कशी करू शकतो की, संपूर्ण परिसरात दुर्गंध आणि अव्‍यवस्‍था असतांना तिथे देवता येतील ?

१. गंगेमध्‍ये डुबकी मारण्‍यासाठी शारीरिक बळाने इतरांना बाजूला लोटून देणे पुण्‍यकारक आहे का ? 

अमृताचे जे बिंदू गंगेमध्‍ये पडले आहेत, ते तेथे निरंतर आहेत आणि शुद्ध भावनेने, स्‍वच्‍छ मनाने, अंतःकरणाने आपण जेव्‍हा जेव्‍हा गंगास्नान करू, तेव्‍हा तेव्‍हा ते अमृतकण आपल्‍या शरिराला स्‍पर्श करणारच ! एका विविक्षित वेळी किंवा काळातच त्‍यांचे अस्‍तित्‍व असते असे नाही, तर त्‍या अमृतकणांची मूळच्‍याच पतित पावन गंगेला आणखी झळाळी आपल्‍या कायमच्‍या अस्‍तित्‍वाने आणली आहे, याचे भान भक्‍तांनी कायम राखले पाहिजे. आपल्‍या वैदिक धर्माने आपल्‍याला आपला उद्धार करण्‍यासाठी अनेक वैज्ञानिक गोष्‍टी सांगितल्‍या आहेत. आता चालू असणार्‍या या कुंभमेळ्‍याच्‍या वेळी आपण सुजाणपणे वागले पाहिजे. प्रत्‍यक्ष गंगास्नानाचे वेळी जी गर्दी होते, ती टाळण्‍यासाठी आपण नीट विचार करायला हवा. गर्दीमध्‍ये लोटालोटी, चेंगराचेंगरी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मला गंगेमध्‍ये डुबकी मारायची आहे; म्‍हणून शारीरिक बळाच्‍या योगाने इतरांना बाजूला लोटून देणे पुण्‍यकारक आहे का ? याचा स्‍वतःशीच विचार करावा.

२. कुंभमेळ्‍यात साहाय्‍य करणार्‍या संघटनांच्‍या कार्यात सहभागी होणे हितकारक ! 

कुंभमेळ्‍याच्‍या वेळी अनेक संघटना साहाय्‍य करण्‍यासाठी कार्यरत असतात. ‘त्‍यांचे हे कार्य गंगा स्नानापेक्षाही पुण्‍यकारक आहे’, असेच वाटते. ज्‍यांना शक्‍य असेल, त्‍यांनी अशा संघटनांच्‍या कार्यात सामील होऊन साहाय्‍य केले, तर ते नक्‍कीच हितकारक ठरेल. तेही शक्‍य नसेल, तर किमान अशा संस्‍थांना सहकार्य करण्‍याचा तरी आपण विचार करूया ! या काळात स्नानाचे वेळी गडबड होणार नाही, हे पाहूया. आपण भारतीय जनता किती सहिष्‍णू आहोत, अशा लाखोंच्‍या समुदायातही आपण एक आचारसंहिता पाळतो, हे जगाला दाखवूया ! कुंभमेळा आपण पूर्वीपेक्षा अधिक यशस्‍वी करून जगापुढे एक आदर्श ठेवूया !’

– योगतज्ञ दादाजी वैशंपायन

(साभार : ‘आध्‍यात्मिक ॐ चैतन्‍य’, गुरुपौर्णिमा विशेषांक २०१५)