
सांगली – ‘अमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा’ यावर शासनाने अधिक लक्ष केंद्रित केले असून या प्रकरणी पोलीस यंत्रणेने सतर्क राहावे. अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचे अन्वेषण करावे. पोलीस विभागाने कोणतीही कुणाचीही गय करू नये. दोषींवर कडक कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ३१ जानेवारीला दिले. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. (असे आदेश का द्यावे लागातात ? – संपादक) या बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांसह जिल्ह्यातील विविध पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, ‘‘अमली पदार्थांचे संकट आपल्या दारापर्यंत येऊन पोचले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकानेही सदैव सजग राहिले पाहिजे. आपल्या मुलांचे भवितव्य सुरक्षित रहाण्यासाठी मिळालेली माहिती पोलीस दलाला वेळीच द्यावी. संबंधितांच्या नावाविषयी गुप्तता पाळली जाईल. पोलीस दलासाठी सर्वसमावेशक आराखडा सिद्ध करून यात पोलिसांसाठी कल्याण निधी, अद्ययावत् संसाधने, पोलिसांना माहिती मिळण्याची व्यवस्था, खबर्यांना आर्थिक साहाय्य देण्याचे प्रावधान आदींच्या अनुषंगाने आगामी काळात सर्वसमावेशक आराखडा करू.’’