कुंभक्षेत्री वसंत पंचमीच्या स्नानासाठी वैद्यकीय व्यवस्था सज्ज !

प्रयागराज, ३१ जानेवारी (वार्ता.) – २९ जानेवारी या मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीनंतर कुंभक्षेत्री प्रशासन सतर्क झाले आहे. ३ फेब्रुवारी या वसंत पंचमीच्या स्नानपर्वानिमित्त येथील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि सज्ज केल्या जात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार ३० जानेवारीपासून सक्रीय झालेल्या ३६० बेड क्षमतेची २३ रुग्णालये भाविकांच्या देखभालीसाठी सिद्ध करण्यात आली आहेत. कुंभपर्व क्षेत्रातील आरोग्य व्यवस्थांची पडताळणी करण्यासाठी विशेष वैद्यकीय पथकाने संपूर्ण क्षेत्राचा आढावा घेतला.

रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सुविधांची समीक्षा करून त्यांची सुसज्जता सुनिश्‍चित करण्यात आली आहे. वैद्यकीय व्यवस्थेचे मंडळ अधिकारी श्री. उमाकांत संन्याल, केंद्रीय रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज कौशिक, वैद्यकीय व्यवस्था सहप्रमुख डॉ. राम सिंह आणि महाकुंभ मंडळ वैद्यकीय स्थापना अधिकारी डॉ. गौरव दुबे यांचा समावेश होता.

जलद कृती पथक (वैद्यकीय उपचार) सुसज्ज !

केंद्रीय चिकित्सालय, इतर आरोग्य सुविधा आणि जलद कृती वैद्यकीय पथक अत्यंत प्रभावी ठरत आहेत. किरकोळ घायाळ झालेल्यांपासून ते गंभीर उपचारांपर्यंत सर्व आवश्यक सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाकुंभ मेळ्याचे वैद्यकीय मंडळ स्थापना अधिकारी डॉ. गौरव दुबे यांनी सांगितले की, आपत्कालीन  वैद्यकीय पथक काही मिनिटांत घटनास्थळी पोचत आहे. रुग्णवाहिका आणि आरोग्य सुविधा आवाहनात्मक परिस्थितीतही पूर्णपणे कार्यरत आहेत. भाविकांची सुरक्षा आणि आरोग्य हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. या संदर्भात व्यापक आरोग्य सेवा आणि पुरेशी वैद्यकीय पथके भाविकांच्या संरक्षणासाठी पूर्णपणे सिद्ध आहेत. यामध्ये १०० बेडचे अत्याधुनिक केंद्रीय चिकित्सालय, २५ बेडची २ उप चिकित्सालये, २० बेडची ८ प्रभाग रुग्णालये आणि २० बेडची २ संसर्गजन्य रोग रुग्णालयेही समाविष्ट आहेत. याशिवाय १ बेडसह १० प्रथमोपचार केंद्रेही कार्यरत आहेत.