कुडाळमधील व्यक्तीची ४२ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद

कुडाळ – आर्थिक गुंतवणुकीतून भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमीष दाखवून शहरातील अभिनवनगर येथील सतीश परशुराम नाईक यांची ४२ लाख ४१ सहस्र ४८३ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी उत्तरप्रदेश, देहली, कर्नाटक आणि केरळ येथील एकूण ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद (दाखल) केला आहे.

सतीश नाईक यांना फॉरेक्स मार्केटमध्ये (फॉरेक्स मार्केट म्हणजे परकीय चलन बाजारात (ज्याला विदेशी मुद्रा किंवा चलन बाजार देखील म्हटले जाते) चलनांची देवाणघेवाण करण्यासाठीची बाजारपेठ) गुंतवणूक करण्याचा विचार होता. यानुसार त्यांनी १२ जुलै २०२३ या दिवशी फेसबुकवर ‘क्वांटम कॅपिटल’ या आस्थापनाचे विज्ञापन पाहिले. यामध्ये वैयक्तिक माहिती भरण्याविषयी नमूद करण्यात आले होते; मात्र नाईक यांनी यामध्ये कोणतीही वैयक्तिक माहिती भरली नाही. यानंतर १५ जुलै २०२३ या दिवशी एका व्यक्तीने व्हॉट्सॲपवरून संपर्क करून आस्थापनाची माहिती दिली. त्यानंतर ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या सहकार्‍याने सांगितल्यानुसार ‘फॉरेन ट्रेडिंग आणि ‘फॉरेन शेअर माकर्ेट इन्व्हेस्टमेंट’मधून लाभ मिळण्याच्या उद्देशाने नाईक यांनी त्या आस्थापनाचे खाते उघडले. त्यानंतर खात्यात १८ जुलै, २५ जुलै, ५ ऑगस्ट, ९ ऑगस्ट, २६ ऑगस्ट आणि त्यानंतर अधूनमधून पैसे गुंतवणे चालू ठेवले. अशा प्रकारे गुंतवलेल्या एकूण २० लाख रुपयांचे २ कोटी ३६ लाख ५४ सहस्र रुपये मिळणार आहेत, असे नाईक यांना त्या व्यक्तींकडून सांगण्यात आले; मात्र ही रक्कम भारतीय चलनात मिळण्यासाठी २२ लाख ४१ सहस्र रुपये भरावे लागतील आणि ही रक्कम न भरल्यास खाते बंद करण्यात येणार असल्याचे नाईक यांना सांगण्यात आले. त्यामुळे कर्ज घेऊन नाईक यांनी ही रक्कम संबंधितांना पाठवली. त्यानंतरही लाभासहित एकूण रक्कम मिळत नसल्याचे पाहून स्वत:ची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने नाईक यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी अभिषेक वर्मा (केरळ), अनिल कुमार (उत्तरप्रदेश), आरव शर्मा आणि समीर शर्मा (दोघेही कर्नाटक) अन् अंबर गील, तसेच अविनाश दास (दोघेही देहली) या ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.

संपादकीय भूमिका

ऑनलाईन व्यवहारात लाखो रुपयांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. असे असूनही सुशिक्षित लोक अधिक हव्यासापोटी याला बळी पडतात. याला ‘मोह’ म्हणतात आणि हा मोह षड्रिपूंपैकी एक आहे. त्यामुळे षड्रिपूंपासून सुटका होण्यासाठी समाजाने साधना करणेच आवश्यक आहे !