
कोरेगाव भीमा (जिल्हा पुणे) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली २ मार्च या दिवशी घेण्यात आलेल्या रक्तदान महायज्ञामध्ये ५ सहस्र ५८९ शंभू भक्तांनी रक्तदान केले. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलीदानाचे स्मरण होण्यासाठी बलीदानमासाच्या प्रारंभी श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शंभूराजांच्या समाधीस्थळावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि वढू बुद्रुक ग्रामस्थ यांच्या वतीने गेल्या ४ वर्षांपासून रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात येते. २०२१ या वर्षी रक्तदान महायज्ञाचा आरंभ झाला. या वेळी पुणे जिल्ह्यासह विविध जिल्ह्यांतून शंभूभक्त उपस्थित होते.

या प्रसंगी आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून देव, देश आणि धर्म रक्षणाचे कर्तव्य बजावलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या बलीदानाची जाणीव म्हणून रक्तदान केल्याची भावना शंभूभक्तांनी व्यक्त केली. या वेळी पुणे सर्जिकल इन्स्टिट्यूट, तर्पण ब्लड सेंटर, अक्षय ब्लड बँक, चाकण ब्लड बँक या ४ रक्त पेढ्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. या वेळी प्रत्येक रक्तदात्याला शंभूराजांची प्रतिमा आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
धर्मवीर शंभूराजांचे स्मरण म्हणून शेकडो शंभूभक्त धारकरी भीमा नदीच्या साक्षीने मुंडन करून बलीदानमासाचा आरंभ शंभूराजांच्या समाधीस्थळावरून करतात.