‘एम्.आर्.आय्.’ यंत्रांसाठी वर्ष २०१७ मधील प्रस्तावानंतरही खरेदी नाही !

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील निष्काळजीपणा !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ‘एम्.आर्.आय्.’ यंत्रांच्या खरेदीसाठी वर्ष २०१७ मध्ये वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाकडे केलेल्या प्रस्तावावर ७ वर्षांनंतरही कार्यवाही करण्यात आलेली नाही. अकोला येथील आमदार साजिद पठाण यांनी याविषयीचा तारांकित प्रश्न ५ मार्च या दिवशी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकारच्या हाफकीन आस्थापनाच्या दुर्लक्षामुळे या खरेदीला दिरंगाई झाल्याची स्वीकृती सभागृहात दिली.

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘एम्.आर्.आय्.’ यंत्रांच्या खरेदीसाठी हाफकीनकडून वर्ष २०२०, २०२१ आणि २०२३ मध्ये निविदा काढण्यात आल्या. त्यासाठी २४ कोटी ९७ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यताही दिली होती; मात्र या निविदांना प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी सभागृहात दिली.  या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अजय चौधरी यांनीही ‘मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये यंत्रांची कमतरता असल्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागतो’, ही व्यथा सभागृहात सांगितली.

शासकीय रुग्णालयांमध्ये यंत्रांच्या खरेदीचा विषय सामान्यांच्या आरोग्याशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील अनेक रुग्णालयांमध्ये यंत्रांची खरेदी प्रलंबित आहे. राज्यात किती रुग्णालयांमध्ये मागण्या अपुर्‍या आहेत, याची माहिती अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहाला द्यावी, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका :

‘एम्.आर्.आय.’सारखे महत्त्वपूर्ण यंत्र ७ वर्षांनंतरही खरेदी न करणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !