|

प्रयागराज – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह त्यांच्या मंत्रीमंडळातील जवळपास सर्वच मंत्र्यांनी २२ जानेवारी या दिवशी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यंनी गंगापूजन करून गंगा नदीची आरती केली.
तत्पूर्वी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संगमक्षेत्री राज्य मंत्रीमंडळाची बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संगमक्षेत्री होणारी मंत्रीमंडळाची झालेली ही दुसरी बैठक होती. यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये झालेल्या अर्धकुंभच्या वेळीही संगमक्षेत्री मंत्रीमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत त्यांनी व्यवसाय, शिक्षण, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा यांच्या संदर्भात अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. यासह योगी आदित्यनाथ सरकारच्या महत्त्वकांक्षी असलेल्या ‘गंगा द्रुतगती महामार्गा’च्या प्रकल्पाला हिरवा कंदिल दिला. हा महार्मा प्रयागराज ते मिर्झापूर, भदोही, वाराणसी, चंदौली मार्गे गाझीपूरपर्यंत बांधण्यात येईल. त्यापुढे तो पूर्वांचल द्रुतगती महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. यामुळे उत्तरप्रदेश राज्याच्या पूर्व आणि पश्चिम भागांचे संपर्क आखणी मजबूत होऊन राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.