Political Attacks On Hindus : (म्हणे) ‘हिंदूंवरील आक्रमणे राजकीय स्वरूपाची !’ –  बांगलादेशातील अंतरिम सरकार

बांगलादेशातील अंतरिम सरकारचे पुन्हा हिंदुद्वेषी विधान

ढाका (बांगलादेश) – बांगलादेश सरकारने एका पोलीस अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, ‘गेल्या वर्षी ४ ऑगस्टपासून अल्पसंख्यांक समुदायांविरुद्ध झालेल्या बहुतेक घटना ‘राजकीय स्वरूपा’च्या होत्या आणि धार्मिक नव्हत्या.’ पोलिसांनी धार्मिक हिंसाचाराच्या थेट तक्रारी प्राप्त करण्यासाठी आणि अल्पसंख्यांक समुदायाशी संपर्क राखण्यासाठी एक हेल्पलाइन कक्ष स्थापन केला आहे आणि एक व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक  देखील प्रसारित केला आहे.

अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांच्या प्रसारमाध्यम विभागाने सांगितले की,

१. ‘बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्‍चन युनिटी कौन्सिल’ने अलिकडेच केलेल्या दाव्यानंतर पोलीस चौकशी चालू करण्यात आली होती. ५ ऑगस्ट २०२४ या दिवशी पदच्युत पंतप्रधान शेख हसीना देश सोडून जाण्याच्या एक दिवस आधी धार्मिक हिंसाचाराच्या २ सहस्र १० घटना घडल्या होत्या. यांपैकी एकूण १ सहस्र ७६९ घटना आक्रमणे आणि तोडफोड या स्वरूपात नोंदवल्या गेल्या.

२. पोलिसांनी आतापर्यंत दाव्यांवर आधारित ६२ गुन्हे नोंदवले आहेत आणि तपासाच्या आधारे किमान ३५ गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलीस चौकशीत असे आढळून आले की, १ सहस्र २३४ घटना ‘राजकीय स्वरूपा’च्या होत्या, २० घटना धार्मिक होत्या आणि किमान १६१ दावे खोटे असल्याचे आढळून आले. एकूण ११५ गुन्हे नोंदवण्यात आले आणि किमान १०० लोकांना अटक करण्यात आली.

३. देशातील कोणत्याही धार्मिक आक्रमणांविषयी आमचे शून्य-सहिष्णुतेचे धोरण आहे आणि पोलिसांना दोषींना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पीडितांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेश आता कट्टर इस्लामी देश झाला आहे. तेथे अन्य धर्मियांना आता कोणतेच अधिकार आणि अस्तित्व नसणार. त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार झाले, तरी त्याचे समर्थन वेगवेगळ्या कारणांद्वारे केले जाणार, हेच यातून पुन्हा स्पष्ट होते !