उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. आदित्य भट हा या पिढीतील एक आहे !
‘पौष शुक्ल द्वादशी (११.१.२०२५) या दिवशी कु. आदित्य प्रदीप भट याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. आदित्य प्रदीप भट याला १३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. जन्मापूर्वी
अ. ‘मला पहिला मास चालू असतांना स्वप्नात दिसले, ‘माझ्या गर्भात पांढर्या रंगाचा गोळा प्रवेश करत आहे.’
आ. मला आठव्या मासात सद्गुरु सत्यवान कदम यांचा सत्संग लाभला. तेव्हा नामजपादी उपाय करतांना ‘माझ्या गर्भात बाळकृष्ण झोपलेला असून त्याच्याभोवती प्रकाशाचे संरक्षककवच आहे’, असे मला जाणवत होते.
२. जन्म ते १ वर्ष
२ अ. बाळ जन्मापासूनच अत्यंत शांत आहे.

२ आ. भावपूर्ण भजन म्हटल्यावर रडणे थांबून शांतपणे झोपणे : बाळ १५ ते २० दिवसांचे असतांना एकदा त्याला झोप येत नव्हती. ते पुष्कळ रडत होते. तेव्हा माझ्या बहिणीने बाळाला घेतले आणि संत पुरंदरदास यांचे भजन भावपूर्ण म्हटले. त्यानंतर बाळ लगेच झोपी गेले.
३. वय १ ते ९ वर्षे
३ अ. चांगली स्मरणशक्ती : आदित्य अल्प कालावधीत ‘श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र’ आणि अन्य स्तोत्र म्हणायला शिकला. त्याला रुद्र, आदित्यहृदय-स्तोत्रम्, पुरुषसूक्तम्, श्रीसूक्तम्, मंत्रपुष्पांजली आणि षोडशोपचार पूजेचे मंत्र येतात.
३ आ. पौरोहित्य करण्याची आवड : त्याला पूजा करण्याची पुष्कळ आवड आहे. तो घरात पूजा आणि धार्मिक कार्य करणार्या व्यक्तीला धोतर नेसायला सांगायचा. तो २ – ३ घंटे काही न खाता श्रद्धेने स्वत: पूजा करायचा. तो धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी पुरोहितांनी उच्चारलेले मंत्र श्रद्धेने ऐकत असे.
३ इ. सात्त्विक गाणी ऐकायला आवडणे : त्याला शास्त्रीय संगीत, भजन, अशी सात्त्विक गाणी ऐकायला आवडतात. त्याचा आवाज सुश्राव्य आणि सुमधुर आहे. तो चित्रपटगीत चुकूनही गात नाही.
३ ई. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता : एकदा आम्ही दुपारी जेवत होतो. तेव्हा आदित्य (वय ६ वर्षे) मला म्हणाला, ‘‘दुपारी एक कावळा जेवणाच्या पटलावर बसला होता.’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘मी कावळा पाहिला नाही. तो येथे कसा येईल ?’’ त्या वेळी मला आठवले, ‘त्या दिवशी माझ्या वडिलांचे श्राद्ध होते. मी श्राद्धाला जाऊ शकले नाही; म्हणून आदित्यला सूक्ष्मातून कावळा आलेला दिसला असेल.’ त्यानंतर मी पितरांसाठी घास (थोडेसे अन्न) ठेवून नमस्कार केला.
३ उ. कन्नड आणि संस्कृत भाषा आवडणे : त्याला इंग्रजी भाषा येत असली, तरी त्याला कन्नड आणि संस्कृत या भाषा आवडतात. आम्ही त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले आहे; पण त्याला कन्नड माध्यमाच्या शाळेत जायचे होते. त्याने शाळेत संस्कृत हा ऐच्छिक विषय घेतला आहे.
३ ऊ. सनातनचे ग्रंथ वाचून त्याप्रमाणे कृती करणे : आदित्यला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेले ग्रंथ वाचायला आवडतात. तो सनातनचे ग्रंथ वाचतो आणि ग्रंथांत सांगितल्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करतो.
४. वय १० ते १२ वर्षे
४ अ. काटकसरी
१. तो आमच्या घरापासून १ कि.मी. अंतरावर असलेल्या तलावात पोहायला जातो. त्याला पोहून झाल्यावर थकवा आला असला, तरीही तो रिक्शाने येत नाही. त्याला पैसे वाया घालवणे आवडत नाही.
२. तो अनावश्यक कपडे, चपला, खेळणी इत्यादी वस्तू विकत घेत नाही.
४ आ. राष्ट्रप्रेम : स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन या राष्ट्रीय सणांच्या दिवशी तो घराच्या आगाशीवर जाऊन राष्ट्रध्वज फडकवतो आणि ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत संपूर्ण म्हणतो.
४ इ. व्यष्टी साधना : तो ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग नियमित ऐकतो. तो नियमित नामजपादी उपाय करतो.
४ ई. सेवाभाव : त्याला सेवा करायला पुष्कळ आवडते. मी सेवा करत असतांना तो माझ्याजवळ बसून निरीक्षण करतो. तो विज्ञापनासंबंधी टंकलेखन करण्याची सेवा शिकत आहे.
४ उ. आसक्ती नसणे : तो आम्हाला आईस्क्रीम किंवा चॉकलेट आणायला सांगत नाही.
४ ऊ. ‘धर्मजागृती आणि धर्मरक्षण’ यांविषयी तळमळ : तो साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ आवडीने वाचतो. एकदा त्याला कुणीतरी सांगितले, ‘‘साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ वाचू नकोस, ते प्रौढांसाठी आहे, तुझ्यासाठी नाही.’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘धर्मरक्षण ही आजच्या काळाची आवश्यकता आहे आणि ते आपले कर्तव्य आहे.’’ त्याला ‘धर्मरक्षण आणि धर्मजागृती’ करण्याची तीव्र तळमळ आहे.
४ ऐ. गुरुंप्रती भाव
१. आदित्यला परात्पर गुरु डॉक्टरांना भेटण्याची इच्छा आहे. त्याला आध्यात्मिक स्तरावरील त्रास होत असल्यास तो ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथ वाचतो आणि तो ग्रंथ शेजारी ठेवून झोपतो.
२. एकदा त्याला आमच्या नातेवाइकांनी पैसे दिले होते. त्याने ते एका पेटीत ठेवले. गुरुपौर्णिमा जवळ आल्यावर त्याला अर्पणाचे महत्त्व कळले. तेव्हा त्याने साठवलेले सर्व पैसे गुरूंच्या कार्यासाठी अर्पण केले.
५. स्वभावदोष : उतावळेपणा, राग येणे, आळशीपणा आणि अव्यवस्थितपणा, मला अधिक कळते, प्रतिमा जपणे, इतरांचा विचार न करणे, मनानुसार करणे’
– सौ. अपर्णा प्रदीप भट (कु. आदित्य भट याची आई), बेंगळुरू, कर्नाटक (२०.५.२०२४)
यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJckमार्गिकेवरही पाहू शकता.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |