पुणे – महाविकास आघाडीचे अनेक मोठे उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाल्याने त्यांनी पराभवाचे खापर इ.व्ही.एम्. यंत्रावर फोडले आहे. निवडणूक अधिकार्यांनी या यंत्रामध्ये फेरफार केल्याने पराभव झाल्याचा आरोप वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. फेर मतमोजणीसाठी जिल्ह्यातील ११ उमेदवारांनी इ.व्ही.एम्. पडताळणीसाठी पैसे भरून अर्ज केला आहे. हडपसर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप, शिरूर येथील राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक बापू पवार यांसह रमेश बागवे, सचिन दोडके या नेत्यांनीही फेर मतमोजणीची मागणी केली आहे. मतदान यंत्राच्या पडताळणीसाठी निवडणूक आयोग स्वतंत्र दिनांक आणि वेळ निश्चित करील. आयोगाच्या निर्देशांनुसार मतदान यंत्राची पडताळणी केली जाईल. मतदान केंद्रावर पडलेली मते आणि प्रत्यक्षात पडलेली मते यांमध्ये मोठी तफावत असल्याचा संशय या उमेदवारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एकूण मतदान केंद्राच्या किंवा मतदान यंत्र संख्येच्या पाच टक्के प्रमाणात मतदान यंत्रांची पडताळणी करून घेण्यासाठी उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यासाठी शुल्क, तसेच कर (जी.एस्.टी.) असे मिळून एकूण ४७ सहस्र रुपये प्रतियंत्र याप्रमाणे त्यांनी शुल्क जमा केले आहे.