बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि गोरक्षक यांनी जीव धोक्यात घालून गोवंशियांची वाहतूक करणारा ट्रक पकडला !

  • खारेपाटण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील घटना

  • गोतस्करांकडून गोरक्षकांना जिवे मारण्याचा प्रयत्न

  • ट्रकचा चालक आदम अली याला पकडण्यात पोलिसांना यश, साहाय्यक पसार

ट्रकमध्ये कोंबून भरण्यात आलेले गोवंश आणि ट्रकचालक आदम अली

कणकवली – बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि गोरक्षक यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून पाठलाग करत पोलिसांच्या साहाय्याने गोवशियांची हत्या करण्यासाठी होणारी वाहतूक करणारा ट्रक (अवजड साहित्याची वाहतूक करणारे वाहन) मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण येथे पकडला. या प्रयत्नात ट्रक चालकाने पाठलाग करणार्‍या गोरक्षकांच्या वाहनावर २ वेळा ट्रक घालण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न ट्रकला मार्ग दाखवणार्‍या चारचाकीनेही (‘पायलट कार’नेही) केला; जिवावर बेतणार्‍या या प्रसंगात गोरक्षकांनी धैर्य दाखवल्याने अंततः ट्रकमध्ये कोंबून भरलेले ९ बैल, ७ गायी आणि ३ वासरे यांना वाचवण्यात यश आले.

१. मालवण तालुक्यीतील आचरा येथून निपाणी (कर्नाटक) येथे मुंबई-गोवा महामार्गावरून एका ट्रकमधून गोवंशियांची वाहतूक होणार असल्याची माहिती बरजंग दलाचे कार्यकर्ते कृष्णा धुळपनावर आणि त्याच्या २ मित्रांनी मिळाली. (सर्व यंत्रणा हाताशी असतांना पोलिसांना ही माहिती का मिळत नाही ? – संपादक)

२. त्यानुसार त्यांनी ६ डिसेंबर या दिवशी सकाळी कणकवलीच्या दिशेने गोवंश घेऊन जाणार्‍या ट्रकचा ओरोस येथून पाठलाग करण्यास प्रारंभ केला.

३. या ट्रकला मागे टाकून (ओव्हरटेक करून) गोरक्षकांनी नांदगाव येथे ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र ट्रकचालकाने फोंडाघाटच्या दिशेने ट्रक वळवून पलायन केले. तरीही गोरक्षकांनी ट्रकचा पाठलाग चालूच ठेवला.

४. पाठलाग करत असतांना ट्रक चालकाने गोरक्षकांच्या कारला धडक देऊन अपघात करण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न या ट्रकच्या सोबत असलेल्या कारच्या चालकानेही केला.

५. पाठलाग करत असतांना गोरक्षकांनी पोलिसांनाही याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी नाकबंदी करून सकाळी ६.३० वाजता खारेपाटण पोलीस तपासणी नाक्यावर ट्रक अडवून कह्यात घेतला.

संपादकीय भूमिका

गोरक्षकांच्या जिवावर उठण्याइतपत उद्दाम झालेले गोतस्कर ! कायद्याचा धाक न राहिल्यामुळेच त्यांच्याकडून अशी कृती होत आहे !