Dattatreya Hosabale : संघाचे स्वयंसेवक काशी आणि मथुरा येथील चळवळींमध्ये सहभागी होऊ शकतात !

संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे विधान

संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

बेंगळुरू (कर्नाटक) – जर रा.स्व. संघाचे स्वयंसेवक मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी आणि काशीमधील ज्ञानवापी या चळवळींमध्ये सहभागी झाले, तर त्यांना संघटनेचा कोणताही आक्षेप रहाणार नाही. आम्ही त्यांना थांबवणार नाही, असे विधान संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले. ते कन्नड नियतकालिक ‘विक्रम’ला मुलाखत देतांना बोलत होते. या वेळी होसबाळे यांनी हेही स्पष्ट केले की, संघाने सर्व मशिदींना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याला विरोध केला, तसेच सामाजिक तेढ टाळण्यावर भर दिला आहे.

होसबाळे पुढे म्हणाले की,

गोहत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविषयी चिंता

गोहत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविषयीच्या चिंता अजूनही आहेत; पण आता आपण इतर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जसे की अस्पृश्यता दूर करणे, तरुणांमध्ये आपली संस्कृती जपणे आणि आपल्या भाषांचे रक्षण करणे.

(चित्रावर क्लिक करा)

प्रत्येकाने संस्कृत शिकावे !

या विशाल देशातील प्रत्येकाने संस्कृत शिकले, तर ते अतिशय चांगले होईल. डॉ. आंबेडकरांनीही याचा पुरस्कार केला होता.

आज आपण भाषेला एक समस्या बनवले आहे !

अनेक लोक बोलतात ती भाषा शिकण्यात काहीच हानी नाही. आज प्रत्येक सैनिक हिंदी शिकतो. ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे ते संबंधित राज्याची भाषा शिकतात. राजकारण आणि विरोध यांमुळे भाषा लादण्याचे सूत्र बनवले गेले आणि समस्या उद्भवली. भाषिक विविधता असूनही भारत सहस्रो वर्षांपासून एकसंध राहिला नाही का ? असे दिसते की, आज आपण भाषेला एक समस्या बनवले आहे. आपल्या सर्व भाषांनी सखोल साहित्यकृतींना जन्म दिला आहे. जर भावी पिढ्या या भाषांमध्ये लिहिण्या-वाचण्या शिकल्या नाहीत तर त्या कशा टिकतील ?

इंग्रजीला आर्थिक पर्याय हवा !

इंग्रजी भाषेचे आकर्षण प्रामुख्याने व्यावहारिक कारणांसाठी आहे. भारतीय भाषांमध्ये शिक्षण घेतलेल्या लोकांना पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील, असे आर्थिक मॉडेल सिद्ध केले पाहिजे. ज्येष्ठ बुद्धिजीवी, न्यायाधीश, शिक्षणतज्ञ, लेखक आणि राजकीय आणि धार्मिक नेते यांनी या प्रकरणात प्रगतीशील भूमिका घेतली पाहिजे.