‘माझे बरेचसे पूर्वायुष्य मायेतील सुख-दु:खात गेले. त्यातून बाहेर पडून मोक्षप्राप्तीसाठी मागील ३२ वर्षे मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुुरुकृपायोग’ या विहंगम मार्गाने साधना करत आहे. योग्य साधना केल्यावर वर्षाला १ ते २ टक्के आध्यात्मिक प्रगती होते. त्यानुसार आता माझी आध्यात्मिक पातळी ९० टक्क्यांच्या जवळपास असायला हवी होती; मात्र अध्यात्मात तर्कशास्त्र आणि युक्तीवाद चालत नाही. स्वभावदोष, प्रारब्ध, आध्यात्मिक त्रास इत्यादींमुळे आध्यात्मिक प्रगतीमध्ये चढ-उतार चालू असतो; म्हणजेच ‘साधना हा साप-शिडीचा खेळ आहे’, असे मला वाटते. याविषयीचे कवितापुष्प मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करत आहे.
साधका साधना हा साप-शिडीचा खेळ ।
प्रगती नि अधोगतीचा तर्काने लावू नको मेळ ॥ १ ॥
साधका जीवन हा प्रारब्ध नि त्रासांचा (टीप १) खेळ ।
मायेतील सुख-दु:खाची नित्य खावी लागते भेळ ॥ २ ॥
साधना करूनी जरी तू प्रगती करीशी ।
अहंरूपी साप गिळूनी अधोगतीस नेेती ॥ ३ ॥
व्यष्टी साधनेचा आढावा नि चुकांचे सत्संग होती (टीप २) ।
सापाच्या तावडीतून सोडवून प्रगतीची शिडी देती ॥ ४ ॥
परम पूज्य (टीप ३) उपायांनी त्रास दूर करीती ।
त्रासरूपी सापापासून साधकांचे रक्षण करीती ॥ ५ ॥
‘गुरुकृपायोग’ (टीप ४) साधनामार्गाने साधक साधना करीती ।
परम पूज्य साधकांना शिडी देऊनी उच्च लोकी नेती ॥ ६ ॥
आता नाही साप-शिडीच्या खेळाचे भय नि चिंता ।
शरणागतीने कृतज्ञतेने लीन होतो परम पूज्यांच्या चरणा ॥ ७ ॥
टीप १ – व्यष्टी आणि समष्टी साधना करणार्यांना अनिष्ट शक्ती त्रास देतात.
टीप २ – स्वभावदोष घालवून गुण वाढवण्यासाठी साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतला जातो आणि त्यांच्या चुका अन् स्वभावदोष यांची जाणीव सर्वांसमक्ष करून दिली जाते.
टीप ३ – परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप ४ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगितला आहे.
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |