श्रीब्रह्मानंद महाराज जेव्हा गोंदवल्यास येत, तेव्हा २-४ आचारी समवेत घेऊन येत. प्रतिदिन नवीन पक्वान्न करून श्रीरामाला नैवेद्य दाखवत आणि सर्व मंडळींना ते पोटभर खाऊ घालत. श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) त्यांना ‘लाडूबुवा’ म्हणत. एकदा त्यांनी राघवदास लाडूंचा नैवेद्य केला होता. दुपारचे जेवण झाले आणि स्वयंपाकघरातील सर्व कामे झाली. दुपारी ३ वाजता श्रीमहाराज रामासमोर बसले होते. २-४ साहेब मंडळी उभी होती. तेवढ्यात एक बाई स्वयंपाकघरात गेली. तिने ७-८ लाडू पदरात घातले आणि परत जायला निघाली. जाण्याची वाट श्रीमहाराजांच्या पुढून होती. ती बाई पुढे आल्यावर पटाईत मावशीने खसकन् तिचा पदर ओढला. त्यासह सगळे लाडू खाली पडले. बाई अतिशय शरमिंदी झाली; पण श्रीमहाराज तिला एवढेच म्हणाले, ‘बाई, ते लाडू घेऊन जावेत. मला मागितले असते, तर मी आनंदाने दिले असते. रामाकडे काही कमतरता नाही; पण पुन्हा असे करू नये.’ लाडू गोळा करून बाई निघून गेल्यावर श्रीमहाराज मंडळींना बोलले, ‘बाईने लाडू नेल्याचे मोठे दुःख नाही; पण जे शाश्वत भगवंताचे प्रेम देण्यासाठी मी येथे बसलो आहे, ते घेण्यासाठी कुणीही पुढे येत नाही याचे वाईट वाटते.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)