‘Good Flippin Burgers’ : बर्गरमध्ये म्हशीच्या मांसाचा वापर; हिंदूंच्या विरोधानंतर दुकान बंद !

कल्याण येथील ‘गुड फ्लिपिन बर्गर्स’ दुकानातील धक्कादायक प्रकार !


ठाणे – कल्याण येथील ‘गुड फ्लिपिन बर्गर्स’ या दुकानात ‘बर्गर’मध्ये म्हशीच्या मांसाचा वापर करण्यात येत होता. एका हिंदु ग्राहकाने याला विरोध केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला. बर्गरमध्ये म्हशीचे मांस असल्याची माहिती दुकानात ठळकपणे न दिल्याचा आक्षेप या हिंदु ग्राहकाने घेतला. ‘हिंदू म्हशीचे मांस खात नाहीत. त्यामुळे ‘बर्गर’मध्ये म्हशीचे मांस वापरायचे असेल, तर त्याविषयी ग्राहकांना माहिती द्यायला हवी’, असे या हिंदु ग्राहकाने दुकानातील कर्मचार्‍यांना सुनावल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या प्रकारानंतर कल्याणमधील वायलेनगर येथील ‘गुड फ्लिपिन बर्गर्स’चे दुकान बंद ठेवण्यात आले.

‘बर्गर’मध्ये म्हशीचे मांस

या व्हिडिओमध्ये कल्याण वायलेनगर येथील ‘गुड फ्लिपिन बर्गर्स’ या दुकानात एक हिंदु ग्राहक पत्नीसमवेत गेला असतांना त्याने ‘बर्गर’ मागितला. बर्गरमधील मांसाविषयी शंका आल्यावर त्याने दुकानातील कर्मचार्‍यांना ‘बर्गर’मध्ये कोणत्या प्राण्याचे मांस आहे ?’, अशी विचारणा केली. त्यावर कर्मचार्‍याने म्हशीचे मांस असल्याचे सांगितले. यावर या हिंदु ग्राहकाने बर्गरची केलेली मागणी रहित केली. या वेळी दुकानामध्ये अन्यही काही ग्राहक ‘बर्गर’ खात होते; मात्र ‘बर्गर’मध्ये म्हशीचे मांस असल्याचे कळताच तेथे बसलेले सर्व ग्राहक उठून गेल्याचे व्हिडिओत दिसत आहे. काही हिंदु ग्राहकांनी त्यांनी दिलेली ‘बर्गर’ची मागणी रहित करून पैसे परत घेतले.

सौजन्य: शाखा 9 न्यूज

‘गुड फ्लिपिन बर्गर्स’ची मुंबई आणि परिसरात एकूण २४ दुकाने आहेत. यासह देहली, पुणे, बेंगळुरू या ठिकाणीही दुकाने आहेत. या दुकानांतील बर्गर्समध्येही म्हशीचे मांस असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संपादकीय भूमिका

राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा असतांना म्हशीचा मांसाचा वापर केला जाणे संतापजनक ! असा प्रकार करणार्‍या दुकानांवर कायमची बंदी आणायला हवी !