अनुमतीविना घेतली तालिबानी मुत्सद्दीची भेट !
माले (मालदीव) – मालदीवने पाकमधील त्याचे उच्चायुक्त महंमद तोहा यांना माघारी बोलावले आहे. त्यांनी १ नोव्हेंबरला मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही अनुमती न घेता इस्लामाबादमध्ये तालिबानी मुत्सद्दी सरदार अहमद साकिब याची भेट घेतली होती. यामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये अफगाणिस्तान-मालदीव संबंधांवर चर्चा झाली. अनुमती नसतांनाही भेट घेतल्यावरून मालदीवने त्यांना परत बोलावले आहे. मालदीवच्या स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार तोहा यांना यावर्षी जुलैमध्ये पाकमध्ये उच्चायुक्त म्हणून पाठवण्यात आले होते.
ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानातील सूत्रे हाती घेतल्यापासून तो विविध देशांशी राजनैनितक संबंध प्रस्थापित करू इच्छित आहे; परंतु अद्याप कोणत्याही देशाने त्याच्या सरकारला मान्यता दिलेली नाही. पाकिस्तान, चीन, रशिया आणि इराण यांसारख्या अनेक देशांनी अफगाणिस्तानशी राजनैतिक संबंध चालू केले आहेत; परंतु सरकारला मान्यता दिलेली नाही.