निरोगी जीवनासाठी व्यायाम – भाग २३
या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/849495.html
‘हो ! व्यायाम केल्याने वेदना न्यून होण्यास साहाय्य होते. आपल्याला होणार्या शारीरिक वेदना न्यून करण्यासाठी आपण बर्याचदा वेदनाशामक गोळी किंवा औषधोपचार यांचाच पर्याय निवडतो; कारण आपल्याला तेच ठाऊक असते; पण काही वेदना औषधे घेऊनही न्यून होत नाहीत. तुम्ही असे अनुभवले आहे का ? असे असूनही आपण वेदना न्यून करण्यासाठी औषधोपचारांचाच पर्याय निवडतो. आपल्या सर्वांनाच ‘वेदनामुक्त व्हावे’, असे वाटते; पण ‘वेदना न्यून करण्यासाठी तात्पुरते उपाय करण्यापेक्षा वेदनांचे मूळ कारण शोधून ते दूर करूया’, असा विचार क्वचितच आपल्या मनात येतो.
शारीरिक वेदना अनेक कारणांमुळे उत्पन्न होऊ शकतात. त्यांमध्ये अनेकदा ‘व्यायामाचा अभाव, शरिराची चुकीची ठेवण (पोस्चर) किंवा दीर्घकालीन मानसिक ताण’, ही कारणे महत्त्वाची असतात. यांतून निर्माण झालेल्या चक्रव्युहात आपण अडकलो की, त्यातून सुटणे कठीण होऊन बसते. ‘व्यायामाचा अभाव आणि निष्क्रीय जीवनशैली’, यांमुळे स्नायूंची शक्ती न्यून होऊ लागते. हे दुर्बल स्नायू शरिराला आवश्यक असलेला आधार देऊ शकत नाहीत, तसेच दुर्बल स्नायूंचा वापर सतत होऊ लागल्याने त्यांच्यावर अधिकच ताण येतो. व्यायामाच्या अभावामुळे स्नायूंची लवचिकताही न्यून होऊ लागते. त्यामुळे शरिराच्या सहज हालचाली होण्यासही अडचणी येऊ लागतात.
अशक्त आणि कडक स्नायूंमुळे शरिराची ठेवण बिघडू लागते. चुकीची ठेवण स्नायूंचा अतिरिक्त ताण वाढवते आणि अतिरिक्त ताणामुळे स्नायू अन् सांधे यांची झीज होऊ लागते. अशा प्रकारे एकंदरच दुखापती वाढून वेदना निर्माण होण्यास हे सर्व घटक कारणीभूत ठरतात. नियमित व्यायाम केल्यास या सर्व समस्या टाळता येऊ शकतात.
व्यायामामुळे स्नायूंची शक्ती वाढते, लवचिकता सुधारते आणि शरिराची नैसर्गिक ठेवण राखली जाते. त्यामुळे वेदनांपासून मुक्ती मिळवण्यास साहाय्य होते. व्यायाम केल्यामुळे नैसर्गिक वेदनाशामके निर्माण होतात आणि रक्ताभिसरण सुधारते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून वेदना लवकर न्यून होतात.
पुनःपुन्हा निर्माण होणार्या वेदनांचे कारण आपल्याला कळत नाही, तेव्हा आपल्या स्तरावर वेदनाशामक गोळी घेऊन तात्कालिक वेदना न्यून करण्यापेक्षा ‘योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणे आणि वेदनांचे मूळ कारण जाणून ते दूर करण्यासाठी प्रयत्न करणे’, हेच हिताचे आहे.’
– सौ. अक्षता रूपेश रेडकर, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (३०.९.२०२४)
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise