पणजी येथे सांत इनेज परिसरात पोलीस लक्ष ठेवणार
पणजी, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – सांत इनेज, पणजी येथील काही नागरिकांनी केलेल्या ‘नरकासुर प्रतिमांच्या मिरवणुकीच्या वेळी मोठ्या आवाजात वाजवल्या जाणार्या संगीतामुळे वृद्ध व्यक्तींना त्रास होतो’, या तक्रारीची नोंद घेऊन मानवाधिकार आयोगाने आयोजकांना नरकासुर प्रतिमांची मिरवणूक आणि दहन या वेळी वाजवल्या जाणार्या संगीताचा आवाज मर्यादित ठेवावा, असा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे या आवाजावर पोलीस प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीच्या पूर्वसंध्येला रात्रभर वाजवल्या जाणार्या संगीतामुळे अनेकांना त्रास होतो. सांत इनेज परिसरातील कामत आर्केड इमारतीच्या शेजारी नरकासुर प्रतिमा करणार्यांकडून मोठ्या आवाजात संगीत वाजवले जाते. या गोंगाटामुळे वृद्धांना त्रास होत असल्याची तक्रार काही नागरिकांनी मानवाधिकार आयोगाकडे केली. तक्रार केल्यानंतर मानवाधिकार आयोगाने या परिसराची पहाणी केली. नरकासुर प्रतिमा आयोजकांच्या वतीने श्रीयश च्यारी यांनी मानवाधिकार आयोगाकडे हस्तक्षेप याचिका प्रविष्ट (दाखल) केली. त्यासंबंधी आदेश देतांना मानवाधिकार आयोगाने ‘नरकासुराची प्रतिमा बनवण्याचे स्थान कामत आर्केड इमारतीपासून २० मीटर अंतरावर असावे आणि संगीताचा आवाज मर्यादित असावा’, असे म्हटले आहे. ‘नरकासुर प्रतिमेच्या मिरवणुकीच्या वेळी होणार्या ध्वनीप्रदूषणाकडे पोलिसांचे लक्ष असणे अपेक्षित आहे, तसेच पोलिसांनी आवाजाचे मोजमाप करून आयोगाला अहवाल सादर करावा’, असा आदेश आयोगाने दिला आहे. मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष डेसमंड डिकोस्ता आणि सदस्य प्रमोद कामत यांनी हा आदेश जारी केला आहे. वर्षानुवर्षे दिवाळीच्या पूर्वसंध्येला निघणार्या नरकासुर प्रतिमांच्या मिरवणुकांमुळे होणार्या गोंगाटामुळे आणि सहन न होणार्या संगीतामुळे वृद्ध अन् रुग्ण व्यक्तींना त्रास होतो. यावर्षी तरी त्याला आळा बसावा, अशी मागणी अनेकांकडून होत आहे.