दीपावली : अंधःकारातून प्रकाशाच्या दिशेने ज्ञानमार्गाने प्रवास

‘श्रावणातील व्रतवैकल्ये, भाद्रपदातील गणेशोत्सव आणि आश्विनातील नवरात्र, दसरा यथासांग पार पडताच आपल्याला वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळी ! हा शब्द उच्चारताच आपल्या मनात आनंदाच्या फुलबाज्या उडू लागतात, कानात दणाणून टाकणारे फटाके वाजू लागतात, उत्साहाचे तुषार उडू लागतात आणि नवे कपडे, नव्या वस्तूंच्या खरेदीची, खमंग फराळाच्या सिद्धतेची चक्रे फिरू लागतात. दीपावलीचा सण म्हणजे वेगवेगळ्या उत्सवांचे जणू स्नेहसंमेलनच ! दीपावली हा प्रकाशाचा उत्सव ! भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण ‘दिवा किंवा ज्योत हे प्रकाशाचे प्रतीक आहे. प्रकाश काळोखावर, अंधःकारावर मात करतो. हा अंधःकार, म्हणजे नुसता अंधार नव्हे, तर अज्ञान, अंधविश्वास हीसुद्धा अंधःकाराचीच रूपे आहेत. या अज्ञान-अंधःकारावर मात करण्यासाठी ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करावा’, हाच उद्देश दिवाळी या सणामागे आहे.

२८ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भगवंताच्या ज्ञानमार्गावर वाटचाल करून विवेकाची कास धरणे, म्हणजेच ज्ञानाची दिवाळी साजरे करणे, वसुबारस, धनत्रयोदशी, धन्वन्तरि जयंती, नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेर पूजन’, यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/847227.html

८. बलीप्रतिपदा

कार्तिक शुक्ल प्रतिपदा, म्हणजे ‘बलीप्रतिपदा’ अर्थात् दिवाळी पाडवा ! हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. विक्रम संवत्सराचा पहिला दिवस म्हणून याचे विशेष महत्त्व मानले जाते.

९. भाऊबीज

कार्तिक शुक्ल द्वितीयेला येते ती भाऊबीज ! हा दिवस भावा-बहिणीच्या नात्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि निर्व्याज प्रेमाचा दिवस. ‘आपला भाऊ कर्तृत्वान व्हावा’, अशी कामना करून बहीण भावाला ओवाळते आणि भाऊही तिला ओवाळणी देऊन सन्मान करतो.

१०. पांडव पंचमी

पांडव पंचमीस ‘ज्ञानपंचमी’, ‘लाभपंचमी’ आणि ‘कडपंचमी’, अशी नावे आहेत. पृथ्वीचे राज्य मिळूनही पांडवांना हे ज्ञान झाले की, कधी ना कधी हा इहलोक सोडावाच लागतो; म्हणून स्वर्गारोहणासाठी पांडवांनी प्रस्थान ठेवले. तो दिवस कार्तिक शुक्ल पंचमीचा होता; म्हणून त्याला ‘पांडवपंचमी’ म्हणतात. ‘देहाला विराम हा कधी ना कधीतरी द्यावाच लागतो’, हे ज्ञान पांडवांना त्या दिवशी झाले; म्हणून त्याला ‘ज्ञानपंचमी’, असेही म्हणतात आणि दिवाळीचा उत्सव सरत आला; म्हणून या दिवसाला ‘कडपंचमी’, असे म्हटले जाते.

११. तुळशीविवाह

कार्तिक शुक्ल एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीविवाह केला जातो.

ध्यायेच्च तुलसीं देवीं श्यामां कमललोचनाम् ।
प्रसन्नां पद्मकल्हार वराभय चतुर्भुजाम् ।।

किरीटहारकेयूरकुण्डलादिविभूषिताम् ।
धवलांशुकसभ्युक्तां पद्मासननिषेदुषीम् ।।

अर्थ : श्यामवर्णी, कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या, प्रसन्न, हातात कमलपुष्प धारण करणार्‍या, वर आणि अभय मुद्रेत असलेल्या, चतुर्भुज, किरीट-हार-केयूर-कुंडले अशा अलंकारांनी शोभणार्‍या, शुभ्र वस्त्र परिधान करून पद्मासनावर बसलेल्या अशा तुलसीदेवीचे ध्यान करावे.

पूजनीय आणि वंदनीय अशी तुळस पवित्र, गुणकारी अन् औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. भगवान श्रीविष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे; म्हणून तुळशीला ‘हरिप्रिया’ म्हणतात. श्रीविष्णु आषाढ शुक्ल एकादशीला शयन करतात आणि कार्तिक शुक्ल एकादशीला जागे होतात.

श्रीविष्णूच्या जागृतीचा उत्सव म्हणजेच प्रबोधोत्सव. तुळशीविवाह आणि प्रबोधोत्सव हे दोन्ही उत्सव एकत्र साजरे करण्याची प्रथा आहे. यामागील एक कथा अशी आहे की, जालंधर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस होता. त्याने अनेकांना जिंकून वैभव प्राप्त केले होते. त्याची पत्नी वृंदा ही महान पतिव्रता स्त्री होती. तिच्या पातिव्रत्याच्या जोरावरच तो अजिंक्य झाला होता. त्याचा त्याला गर्व झाला होता. जालंधरचे गर्वहरण करावे, या उद्देशाने श्रीविष्णूने जालंधराचे रूप धारण केले आणि त्याच रूपात तो वृंदेजवळ राहू लागला. वृंदेचे पातिव्रत्य भंग पावले आणि जालंधर युद्धात मारला गेला. हे सर्व वृंदेच्या लक्षात येताच तिने श्रीविष्णूला शाप दिला आणि स्वतः अग्निकाष्ठे भक्षण करून सती गेली. तिच्या मृत्यूस्थानी एक वनस्पती उगवली. ती वनस्पती म्हणजेच ‘तुळस’ होय. त्यामुळेच श्रीविष्णूला तुळस अत्यंत प्रिय झाली. तुळस ही पतिव्रता स्त्रीचे प्रतीक आहे. या निमित्ताने आपण पतिव्रता धर्माचे स्मरण करावे आणि पावित्र्याचीच पूजा करावी.

१२. वैकुंठचतुर्दशी

कार्तिक शुक्ल चतुर्दशीला ‘वैकुंठ चतुर्दशी’ म्हणतात. याविषयी पुराणातील कथा अशी आहे – वाराणसीच्या मनकर्णिका तीर्थात भगवान श्रीविष्णु सहस्र कमळांनी श्री विश्वेश्वराची पूजा करत बसले असता त्यांची परीक्षा पहाण्यासाठी भगवान शंकरांनी त्यातील एक कमळ लपवले. श्रीविष्णूंच्या लक्षात येताच पूजेत उणीव राहू नये; म्हणून त्यांनी स्वतःचे नेत्रकमल अर्पण करून सहस्र कमळे वहाण्याचा संकल्प पूर्ण केला. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना त्रैलोक्याचे राज्य दिले आणि वर मागण्यास सांगितले. श्रीविष्णूंनी ‘राक्षसी शक्तीचा निःपात करण्यासाठी लोकांना छळणार्‍या दैत्य आणि राक्षसांचा नाश माझ्या हातून व्हावा’, असा वर मागितला. भगवान शंकरांनी त्यांना सुदर्शनचक्र दिले आणि ‘कार्तिक शुक्ल चतुर्दशीला जे ध्यान करून मनकर्णिकेत स्नान करतील, त्यांना वैकुंठ प्राप्ती होईल’, असा वर दिला. तेव्हापासून कार्तिक शुक्ल चतुर्दशीला ‘वैकुंठचतुर्दशी’, असे म्हणतात. या दिवशी शंकर आणि श्रीविष्णू यांची भेट असते अन् केवळ याच दिवशी श्री शंकरांना १०८ तुळशीची पाने आणि श्रीविष्णूंना १०८ बेलपाने वाहिली जातात.

१३. त्रिपुरारी पौर्णिमा

या दिवशी घरात आणि मंदिरात दिव्यांची रोषणाई केली जाते. मंदिरातील दीपमाळा, कोनाडे तेलाचे दिवे लावून उजळवले जातात. रात्री १२ वाजता त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. भगवान शंकरांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवांना त्रास देणार्‍या त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला. त्यामुळे आनंदित होऊन देवतांनी दीपोत्सव साजरा केला. या दिवशी दीपदानाला अत्यंत महत्त्व आहे. ‘दानवी शक्तीचा नाश करून सद्विचार आणि सदाचार यांनी जगावे’, हाच संदेश त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवातून दिला जातो.

१४. देवदिवाळी

मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला देवदिवाळी हा सण साजरा केला जातो. देवदिवाळी ही मुख्यत्वे कोकण प्रातांत आणि खानदेशात साजरी केली जाते. आपले कुलस्वामी आणि कुलस्वामिनी, तसेच इष्ट देवीदेवता यांच्या खेरीज ज्या देवीदेवता आहेत त्यात स्थानदेवता, वास्तुदेवता, ग्रामदेवता, महापुरुष, वेतोबा इत्यादी अन् आपल्या गावातील इतर महत्त्वपूर्ण अशा मुख्य उपदेवीदेवतांना या देवदिवाळीच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करून नैवेद्यरूपाने त्या त्या देवीदेवतांचा मानाचा भाग पोचवण्याचा महत्त्वाचा विधी या दिवशी केला जातो. घरातील, गावातील आणि घराण्यातील पूर्वापार चालत आलेल्या अशा सर्व देवतांचा उल्लेख करून त्यांचा आदरसन्मान केला जातो. ‘या सर्व देवता संतुष्ट झाल्यावर त्यांच्याकडून होणार्‍या कृपाछत्रामुळे आपल्या घरावर दुष्ट शक्तींची छाया पडत नाही’, असा दृढसमज आहे.

देवदिवाळी या सणाने खर्‍या अर्थाने दिवाळीची सांगता होते. आपल्या भारतीय संस्कृतीत वर्षभर आपण अनेक सण साजरे करतो. या उत्सवांमुळे आपल्याला प्रतिदिनच्या घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे चालणार्‍या आयुष्यात काही काळ वेगळा आनंद मिळतो. एकमेकांतील नातेसंबंध अधिक दृढ होण्यास साहाय्य होते आणि पुन्हा नव्याने जगण्याची उमेदही मिळते. दीपावली हा सण त्यापैकीच एक आनंदाचा, प्रसन्नतेचा आणि प्रकाशाचा उत्सव. दीपोत्सव म्हणजे केवळ दिवे, पणत्या लावणे एवढाच मर्यादित अर्थ नाही, तर अंधःकारातून प्रकाशाच्या दिशेने ज्ञानमार्गाने केलेला प्रवास होय. मोह, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा अंधःकार नष्ट करून ज्ञानाचा नंदादीप आपल्या हृदयात लावणे, हाच खरा दीपावलीचा अर्थ आहे. दिवा किंवा पणती हे ज्ञानाचे प्रतीक आहे. या ज्ञानदिव्याच्या प्रकाशाने ज्या क्षणी आपण आपले जीवन उजळवून टाकू त्याचक्षणी आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस हा नित्य दिवाळीचा दिवस होईल. आळस, राग, द्वेष, मत्सर, मद, मोह आदी विकारांचा त्याग करून सदाचार, सद्विचार, सहानुभूती, सहनशीलता, दया, क्षमा, शांती आणि आजच्या धकाधकीच्या अन् तणावपूर्ण जीवनशैलीत सर्वांत आवश्यक असलेली सकारात्मक विचारसरणी यांचा आपण अवलंब केल्यास आपले जीवन खर्‍या अर्थाने उजळून निघेल अन् ‘सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ।।’, म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘सर्वांठायी ब्रह्मच आहे हे ज्ञान झाले, म्हणजे त्रिपुटी सांडली, तेव्हा आत्मज्ञान झाले’, अशी अपूर्व मनःशांतीची अवस्था आपल्याला प्राप्त होईल !’

(समाप्त)

शुभ दीपावली !

– सौ. प्रज्ञा कुलकर्णी, डोंबिवली

(साभार : मासिक ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक)

आज ‘धनत्रयोदशी’ त्या निमित्ताने…

वैद्य धन्वन्तरि


आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी !

या दिवशी मुख्यत्वे करून धनाची आणि धनाचा रक्षक असणार्‍या कुबेराची पूजा करतात. या दिवशी घरातील सोने नाणे, अलंकार स्वच्छ करतात. उपवास करून विष्णु, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी या देवतांचे पूजन करतात. धने आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवतात. समुद्रमंथनातून याच दिवशी लक्ष्मी प्रगट झाली, असे मानतात.

या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करतात. या दिवशी अखंड दीप लावावा. पायसाचा (तांदळाची खीर) नैवेद्य दाखवावा आणि यथाशक्ती परोपकार करावा. या व्रताची कथा अशी आहे की, यमराजाने दूतांना विचारले, ‘प्राणहरण करतांना तुम्हाला दुःख होत नाही का ?’ त्यावर यमदूत म्हणाले, ‘हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राण १६ व्या वर्षी घेतांना दुःख झाले. त्यामुळे अपमृत्यू टाळायला तुम्हीच उपाय सांगा.’ यमराजाने सांगितले, ‘धनत्रयोदशीच्या दिवशी जो हे व्रत करून दीपदान करील, त्याला अपमृत्यू येणार नाही.’

धन्वन्तरि जयंती

आश्विन कृष्ण द्वादशी या दिवशी प्रदोषकाळी वैद्य धन्वन्तरिची पूजा करतात. भगवान धन्वन्तरीचा जन्म या दिवशी झाला, असे मानतात आणि धन्वन्तरि जयंती साजरी करतात. हा वैद्यकशास्त्राचा देव आणि देवांचा वैद्य आहे.

– डॉ. ज्योत्सना खरे