दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी : नायजेरीयन नागरिकाची आत्महत्या !…बँकेला टाळे ठोकणार्‍या ग्राहकावर गुन्हा नोंद !

नायजेरीयन नागरिकाची आत्महत्या !

डोंबिवली – येथे इमारतीच्या १५ व्या माळ्यावरून उडी मारून अर्नेस्ट ओबीरथ या ४२ वर्षांच्या नायजेरीयन नागरिकाने आत्महत्या केली आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; पण आधुनिक वैद्यांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूप्रकरणी कुणावरही संशय नसल्याचा पोलीस अभिलेखात उल्लेख करण्यात आला आहे.


बँकेला टाळे ठोकणार्‍या ग्राहकावर गुन्हा नोंद !

सोलापूर – बँकेच्या आर्थिक कामकाजाची वेळ संपल्यानंतर बँक बंद केली असतांनाही संतप्त बँक खातेदाराने बँकेला बाहेरून टाळे ठोकले. यामुळे बँक कर्मचार्‍यांना २ घंटे तेथेच अडकून बसावे लागले. उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे बँक ऑफ बडोदाच्या शाखेत हा प्रकार घडला. या प्रकरणी ग्राहक तानाजी नामदेव दरेकर (वय ४५ वर्षे) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका : शासकीय कामात हस्तक्षेप करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !


युवकाची हत्या करणारे ७ आरोपी अटकेत !

भिवंडी – येथे भ्रमणभाष चोरीच्या संशयावरून एका युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पोलिसांनी ३ घंट्यांत हत्या झालेल्या युवकाची ओळख पटवली. त्यानंतर ७ आरोपींना अटक करण्यात आली.


दिव्यांगांऐवजी तरुणांची नावे मतदानसूचीत !

सातारा – येथील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभात दिव्यांग मतदारांच्या नावांच्या ठिकाणी तरुण मतदारांची नावे आली आहेत. दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदार घरातूनच टपाली मतदान करणार आहेत; पण त्यांच्या नावांची ठिकाणी तरुणांची नावे आल्याने ते मतदान कसे करणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संपादकीय भूमिका : प्रशासनाचा सावळागोंधळ ! याला उत्तरदायी कोण ?


वन अधिकार्‍यांची ८ लाखांची फसवणूक !

चंद्रपूर – येथील वन विभागात कार्यरत उच्चपदस्थ वन अधिकार्‍यांना पोलिसांचा धाक दाखवून त्यांची ८ लाख २० सहस्र रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. एका उच्चशिक्षित महिलेलाही ३१ लाख रुपयांनी फसवण्यात आले. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका : अशी फसवणूक करणार्‍यांना कठोर शिक्षा कधी होणार ?