‘स्नायूंचे आरोग्य उत्तम असणे’, म्हणजे काय ?

निरोगी जीवनासाठी व्यायाम – भाग २०

‘सोप्या भाषेत सांगायचे, तर ‘दैनंदिन कृती सहजतेने आणि कोणताही ताण किंवा वेदना विरहित करू शकणे’, याला ‘स्नायूंच्या आरोग्य उत्तम असणे’, असे म्हणू शकतो. या कृती करण्यासाठी स्नायूंमध्ये ‘शक्ती, लवचिकता आणि सहनशक्ती’, हे तीन घटक पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक असते. त्यांच्या स्थितीवरून आपण स्नायूंच्या आरोग्याचा अंदाज लावू शकतो.

या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/845664.html

१. स्नायूंची शक्ती (muscle strength)

‘आपण एखादी वस्तू किती दूर फेकू शकतो ? किंवा किती जड ‍वस्तू उचलू शकतो ?’, हा स्नायूंच्या शक्तीचा मापदंड आहे. बलवान स्नायूंमुळे अवजड कामे करता येतात; कारण त्यामुळे सांधे आणि हाडे यांना चांगला आधार मिळतो. परिणामी शरिराला स्थिरता आणि चांगली ठेवण राखता येऊन दुखापती टाळता येऊ शकतात.

सौ. अक्षता रेडकर

२. स्नायूंची लवचिकता (flexibility)

‘आपण सर्व सांध्याच्या हालचाली पूर्ण करू शकतो का ?’, हे स्नायूंच्या लवचिकतेवर अवलंबून असते. नेहमीचे उदाहरण पहायचे झाले, तर आपल्या खांद्यामागील वस्तू पहायला आपण केवळ मान वळवत असू, तर मानेचे स्नायू लवचिक आहेत आणि आपल्याला मानेसह खांदेही थोडे वळवावे लागत असतील, तर मानेच्या स्नायूंची लवचिकता न्यून झाली आहे. ल‍वचिकतेमुळे एकूण गतीशीलता (Mobility) सुधारते आणि सांध्यांची हालचाल सहजतेने होऊन दुखापतीचा धोका न्यून होतो, तसेच शरिराची ठेवण (Posture) आणि संरेखनही  (Alignment ही) योग्य स्थितीत रहाते. लवचिक स्नायू हे निरोगी शरिराचे प्रमाण आहे, तर ‘लवचिकता न्यून होणे’, म्हणजे रोगनिर्मितीच्या उंबरठ्यावर असल्यासारखे आहे.

३. स्नायूंचा चिवटपणा (stamina/endurance)

स्नायूंचा चिवटपणा, म्हणजे स्नायू न थकता दीर्घकाळपर्यंत कार्यरत रहण्याची क्षमता होय. ‘स्नायू न थांबता सतत किती वेळ कार्य करू शकतात ? किंवा किती काळ काम केल्यावर स्नायू दमतात / दुखू लागतात ?’, हे स्नायूंच्या चिवटपणाचे (stamina चे) मोजमाप आहे. ‘आपण दिवसभरात किती वेळ एकाच स्थितीत थांबू शकतो किंवा एकसारख्या हालचालींची कामे करू शकतो ?’, हे यावरच अवलंबून असते.’

– सौ. अक्षता रूपेश रेडकर, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (३०.०९.२०२४)

निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise