नवी देहली – ‘हिंदुत्व’ या शब्दाऐवजी ‘भारतीय राज्यघटना’ असा शब्द वापरण्याची मागणी करणारी याचिका देहलीतील विकासपुरी येथील रहिवासीडॉ.एस्.एन्. कुंद्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने म्हटले की, ‘हा प्रक्रियेचा पूर्ण दुरुपयोग आहे. आम्ही त्यावर विचार करणार नाही.’ याआधीही सर्वोच्च न्यायालयाने ‘हिंदुत्व’ संकल्पनेविषयी विविध खटल्यांमध्ये भाष्य केले आहे.
वर्ष १९९५ मध्ये शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या भाषणाच्या संदर्भात एका खटल्याचा निकाल देतांना सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाची व्याख्या ‘हिंदुत्व ही जीवनपद्धत आहे’, असे म्हटले होते. हिंदुत्ववाद किंवा हिंदुत्व हे शब्द समजून घेतले जावेत, असे नाही. त्यांचा संक्षिप्त अर्थ लावणे आवश्यक नाही. ते केवळ भारतीय लोकांच्या संस्कृतीशी आणि लोकांच्या आचारविचारांशी संबंधित नसलेल्या कठोर धार्मिक प्रथांपुरते मर्यादित आहेत. ते भारतीय लोकांच्या जीवनशैलीचे चित्रण करतात, असे सर्वोच्च न्यायालयाने त्या वेळी म्हटले होते.
वर्ष १९९५ च्या निकालाचे पुनरावलोकन करावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती. त्या वेळीही न्यायालयाने या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला होता.