India Canada row : पंतप्रधान ट्रुडो यांनी राजकीय स्‍वार्थासाठी भारतासमवेतचे संबंध बिघडवले ! – संजय वर्मा, कॅनडातील भारताचे माजी उच्‍चायुक्‍त

कॅनडातील भारताचे माजी उच्‍चायुक्‍त संजय वर्मा यांचा आरोप

डावीकडून पंतप्रधान ट्रुडो आणि संजय वर्मा

ओटावा (कॅनडा) – कॅनडाने निज्‍जर हत्‍येच्‍या प्रकरणी आतापर्यंत कोणताही पुरावा सादर केलेला नाही. कॅनडाच्‍या पंतप्रधानांनी स्‍वतः मान्‍य केले आहे की, त्‍यांच्‍याकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. ती केवळ गुप्‍तचरांनी मिळवलेली माहिती होती. याच्‍या आधारे जर तुम्‍हाला एखादे नाते खराब करायचे असेल, तर तसे करा. ट्रुडो यांनी राजकीय स्‍वार्थासाठी हे केले आहे, असा आरोप कॅनडातील भारताचे माजी उच्‍चायुक्‍त संजय वर्मा यांनी केला आहे. भारतात परतण्‍यापूर्वी त्‍यांनी कॅनडातील वृत्तवाहिनी ‘सीटीव्‍ही’ला मुलाखत दिली. यामध्‍ये त्‍यांनी हे आरोप केले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांनी भारतावर पुन्‍हा आरोप केल्‍यानंतर भारताने कॅनडातील उच्‍चायुक्‍त संजय वर्मा यांच्‍याह ६ मुत्‍सद्दींना भारतात परत बोलावले आहे.

कॅनडाची गुप्‍तचर संस्‍था खलिस्‍तानी कट्टरतावादी आणि आतंकवादी यांना प्रोत्‍साहन देते !  

वर्मा पुढे म्‍हणाले की, हरदीप सिंह निज्‍जर याच्‍या हत्‍येशी संबंधित सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत. कॅनडा सरकारने आतापर्यंत कोणताही पुरावा सादर केलेला नाही. कॅनडाच्‍या परराष्‍ट्रमंत्री (मेलानिया जोली) कोणत्‍या ठोस पुराव्‍यांबद्दल बोलत आहेत, ते मला पहायचे आहे. कॅनडाची गुप्‍तचर संस्‍था खलिस्‍तानी कट्टरतावादी आणि आतंकवादी यांना प्रोत्‍साहन देत आहे.

कॅनडात रहाणारे खलिस्‍तानी आतंकवादी कॅनडाचे नागरिक !

माजी उच्‍चायुक्‍त वर्मा पुढे म्‍हणाले की, कॅनडात रहाणारे खलिस्‍तानी आतंकवादी  भारतीय नसून कॅनडाचे नागरिक आहेत. हे लोक कॅनडाच्‍या भूमीतून भारताविरुद्ध काम करत आहेत. कॅनडाच्‍या सरकारने अशा लोकांसमवेत काम करू नये, अशी आमची इच्‍छा आहे. ते भारताच्‍या सार्वभौमत्‍वाला आणि अखंडतेला आव्‍हान देत आहेत. कॅनडाच्‍या नेत्‍यांना असे वाटत असेल की, ‘आमचे शत्रू तेथे काय करत आहेत, याची आम्‍हाला कल्‍पना नाही ?’, तर मला खेद वाटतो की, ते नवशिके आहेत. कदाचित् त्‍यांना आंतरराष्‍ट्रीय संबंध काय असतात, हे ठाऊक नसावे.

संपादकीय भूमिका

कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांनी राजकीय स्‍वार्थाने आरोप केल्‍यामुळे भारताने कितीही सुनावले, तरी पंतप्रधान ट्रुडो यांच्‍यावर त्‍याचा काहीही परिणाम होणार नाही आणि ते आरोप करून राजकीय पोळी शेकत बसणार ! कॅनडाच्‍या जनतेनेच ट्रुडो यांना याविषयी जाब विचारणे आवश्‍यक आहे !