Tamil Anthem Controversy : तमिळ गाण्यातील ‘द्रविड’ शब्द वगळल्यावरून तमिळनाडूचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात वाद !

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन व तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि आणि मुख्यमंत्री एम्. के. स्टॅलिन यांच्यात तमिळ गाण्यातील ‘द्रविड’ शब्द वगळण्यात आल्यावरून वाद झाला. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केंद्र सरकारकडे ‘राज्यपालांना परत बोलवावे’, अशी मागणी केलीे, तर राज्यपालांनी ‘द्रविड शब्द मी वगळायला सांगितल्याचा आरोप चुकीचा आहे’, असे म्हटले आहे.


काय आहे प्रकरण ?

चेन्नईच्या दूरदर्शन केंद्रात हिंदी भाषा महिना साजरा करण्याच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल उपस्थित होते. त्या वेळी ‘तमिळ थाई वाल्थू’ हे तमिळ गाणे गाण्यात आले. हे गाणे गातांना ‘थेक्कनमुम आदिल सिरंथा द्रविड नाल थिरू नडूम’ ही ओळ गायली गेली नाही. यावरून मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले, ‘द्रविड’ शब्दाच्या ‘अ‍ॅलर्जी’ने ग्रस्त असलेले राज्यपाल हा शब्द राष्ट्रगीतातूनही काढून टाकतील. तमिळनाडू आणि तेथील जनतेच्या भावनांचा जाणीवपूर्वक अपमान करणार्‍या राज्यपालांना सरकारने तत्काळ परत बोलावले पाहिजे.’ दुसरीकडे दूरदर्शन केंद्राने ही ओळ चुकून गाण्याची राहिल्याचा खुलासा केला.


१. या पोस्टला उत्तर देतांना राज्यपाल रवि यांनी लिहिले, ‘मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर वर्णद्वेषी टिप्पणी केली आहे आणि माझ्यावर तमिळ गाण्याचा अपमान केल्याचा खोटा आरोप केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा अल्प होते.

२. राज्यपाल रवि यांच्या पोस्टला उत्तर देतांना मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी लिहिले, ‘जर तुम्ही खरोखरच तमिळ गाणे पूर्ण भक्तीभावाने गात असाल, तर हे गाणे मंचावर पूर्ण गायले गेले नाही, तेव्हाच तुम्ही आक्षेप का घेतला नाही ?

३. यानंतर राज्यपालांनी लिहिले, ‘घटनात्मक पदावर असलेली एखादी व्यक्ती जातीयवादी टोळीच्या हातचे बाहुले बनून तमिळ भूमीत जातीय विचारांची बीजे पेरण्याचा विचार करत असेल, तर तमिळनाडूची जनता ही कल्पना नाकारेल.

४. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मोदी यांनी ‘टॅग’ करत (सूचित करत) लिहिले की, भारतीय राज्यघटनेत कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देत नाही. बहुभाषिक राष्ट्रात बिगर हिंदी राज्यांमध्ये हिंदी महिना साजरा करणे, म्हणजे इतर भाषांचा अवमान करणे होय. त्यामुळे असे प्रसंग टाळावेत, असे मी सुचवतो.

त्याऐवजी राज्यांमध्ये स्थानिक भाषा महिना साजरा करण्यास प्रोत्साहित करा. भारतात १२२ भाषा आहेत. इतर १ सहस्र ५९९ बोलीभाषा आहेत. भारत हा विविधतेने नटलेला देश असतांना केवळ एकच भाषा साजरी करण्याचे कोणतेही औचित्य नाही. देशात १ सहस्र ७००हून अधिक भाषा बोलल्या जातात, विशेषत: आमच्या राज्यात तमिळ ही जगातील सर्वांत जुनी भाषा बोलली जाते, त्यामुळे हिंदी महिना साजरा करण्यामुळे देशातील विविधतेवर परिणाम होईल. भारतात राष्ट्रभाषा असे काहीही नाही. १४ सप्टेंबर १९४९ या दिवशी हिंदी ही देशाची अधिकृत भाषा म्हणून घोषित झाल्यामुळे हिंदी दिवस आणि हिंदी महिना साजरे करणे योग्य असेल, तर तमिळ भाषेलाही साजरे करण्याचा समान अधिकार देण्यात यावा.

संपादकीय भूमिका

देशात अनेक गंभीर प्रश्‍न असतांना तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन अशा गोष्टींवरून वाद घालून स्वतःचा आणि जनतेचा वेळ वाया घालवत आहेत !