हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपाली महाडिक ‘नवदुर्गा सन्मान’ पुरस्काराने गौरवान्वित !

‘नवदुर्गा सन्मान’ पुरस्कार स्वीकारतांना हिंदु जनजागृती समितीच्या  सौ. रूपाली महाडिक आणि मान्यवर

सातारा, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील ‘पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर ट्रस्ट’च्या वतीने हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपाली महाडिक यांना ‘नवदुर्गा सन्मान’ पुरस्काराने गौरवण्यात आले. १६ ऑक्टोबरला श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांच्या उपस्थितीत नवरात्र महोत्सवाचा सांगता समारंभ पार पडला. या समारंभाला ‘राष्ट्र सेविका समिती’च्या अधिवक्त्या अपर्णाताई महाशब्दे, राष्ट्रीय काँग्रेसच्या रजनीताई पवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुकुंदराव आफळे, ‘पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर ट्रस्ट’चे संस्थापक सदस्य सुभाषराव बागल, विद्यमान अध्यक्ष धनंजय देशमुख, सचिव सतीश तुपे, आफळे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून ‘रणरागिणी सेविका’ म्हणून सौ. रूपाली महाडिक सेवारत आहेत. धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक शिक्षणाच्या माध्यमातून नवीन युवा पिढीची जडणघडण होण्यासाठी त्या विशेष प्रयत्नशील आहेत. बालसंस्कार आणि युवा संस्कार प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करून संस्कारक्षम राष्ट्र-धर्म प्रेमी, निर्व्यसनी पिढी घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्या सातत्याने करत आहेत. ‘लव्ह जिहाद’ या विषयात युवतींमध्ये जागृती करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी गावोगावी जाऊन त्या व्याख्याने, समुपदेशनाचे कार्य करत आहेत. धर्माभिमानी, सुसंस्कृत, देशभक्त पिढी घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सौ. रूपाली महाडिक करत आहेत. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून सौ. रूपाली महाडिक यांना ‘नवदुर्गा सन्मान’ पुरस्काराने गौरवण्यात आले.