महंत रामगिरी महाराजांच्या सरला बेट येथे सुरक्षा वाढवली !

सामाजिक माध्यमांवर धर्मांधांकडून चिथावणीखोर संदेश प्रसारित 

महंत रामगिरी महाराज

छत्रपती संभाजीनगर – महंत रामगिरी महाराज यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘श्री गंगागिरी महाराज संस्थान’ अर्थात् सरला बेट येथे सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली  आहे. धर्मांधांकडून छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत एक संदेश सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आला. या संदेशाद्वारे छत्रपती संभाजीनगर येथे एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. हा संदेश प्रसारित झाल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सरला बेटावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. विविध पोलीसदलांचा मोठा फौजफाटा तैनात केला असल्याने सरला बेटाला छावणीचे स्वरूप आले आहे.

प्रसारित पोस्टमध्ये काय म्हटले ?

‘हम बताने आ रहे है सही क्या और गलत क्या । हुजुर की शान मे गुस्ताखी बर्दाश नही करेंगे… चलो सरला बेट…’, (योग्य काय, अयोग्य काय ?, हे सांगण्यासाठी आम्ही येत आहोत. प्रेषितांचा अनादर करण्याचा गुन्हा आम्ही सहन करणार नाही …चला सरला बेट), अशा आशयाची पोस्ट धर्मांधांकडून प्रसारित होत आहे.  सरला बेटावर रामगिरी महाराजांचे भक्तगणही उपस्थित आहेत.

काय आहे प्रकरण ?

काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे महंत रामगिरी महाराज यांनी  प्रवचनातून इस्लामचा अवमान केल्याचा कथित आरोप करण्यात आला होता. त्यांच्या या विधानामुळे मुसलमानांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने आणि निदर्शने केली, तसेच महंत रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणीही केली होती. त्यांच्यावर काही ठिकाणी गुन्हे नोंद झाले आहेत.