सांगली, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – महाराष्ट्र शासनाच्या जैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळावर दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्याविषयीचा शासन निर्णय सचिवांनी काढला आहे.
महाराष्ट्रामध्ये जैन समाज हा सधन दिसत असला, तरी या समाजाच्या सामाजिक, विद्यार्थी उद्योजक, शैक्षणिक संस्था, सामाजिक, धार्मिक संस्था यांच्यासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यांचे निराकरण होण्यासाठी जैन समाजाला शासन दरबारी योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी होत होती. त्याचा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे अन् भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी पाठपुरावा केला होता.