रामनाथी (फोंडा), १२ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील श्री रामनाथ देवस्थानात १२ ऑक्टोबरला सीमोल्लंघन कार्यक्रम आणि दसरोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
सायंकाळी सीमोल्लंघनाचे प्रतीक म्हणून देवालयानजीक असलेल्या डोंगरावरील शमीच्या पेडापर्यंत (पारापर्यंत) श्री रामनाथदेवाच्या उत्सवमूर्तीची सुवर्णाच्या पालखीतून आणि श्री कामाक्षीदेवीच्या उत्सवमूर्तीची चांदीच्या पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ब्रह्मवृंदांनी शमी आणि आपटा या वृक्षांचे, तसेच शस्त्रांचे पूजन करून सर्व भाविकांसाठी शुभसंकल्प केला आणि प्रार्थना केली. त्यानंतर सोने लुटण्याचा पारंपरिक कार्यक्रम झाला.
या सीमोल्लंघन कार्यक्रमात देवस्थानचे पदाधिकारी, सेवेकरी, कुळावी आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डोंगरावरील पेडाकडे जाण्याचा मार्ग येथील सनातनच्या आश्रमाच्या भूखंडातून जातो. या पालखी मिरवणुकीच्या मार्गावर सनातनच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे भाविकांचे स्वागत करणारा फलक लावण्यात आला होता आणि देवाची सेवा म्हणून भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले. सनातनच्या आश्रमातील साधकांनी श्रींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.