काँग्रेसचे राहुल गांधी यांची भूमिका भारतीय लोकशाहीसाठी धोकादायक !

‘मसुदा समितीला हे स्पष्ट करायचे होते की, भारत हे संघराज्य असले, तरी हे संघराज्य, म्हणजे राज्यांनी संघराज्यामध्ये सहभागी होण्याच्या कराराचा परिणाम नव्हता. कोणत्याही राज्याला त्यापासून वेगळे होण्याचा अधिकार नाही. संघराज्य एकसंघ आहे; कारण ते अविनाशी आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी देश आणि जनता यांची विविध राज्यांमध्ये विभागणी केली गेली असली, तरी देश हा एक अविभाज्य भाग आहे, त्यातील लोक हे एकाच स्रोतापासून बनलेल्या एकाच साम्राज्याखाली रहाणारे लोक आहेत.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर (४.११.१९४८ या दिवशी ‘संविधान सभे’त मसुदा सादर करतांना केलेले भाषण)

१. राहुल गांधी यांची पाठराखण करणारे ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा !

‘राहुल गांधी हे ‘पप्पू’ नाहीत’, असे प्रमाणपत्र ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी त्यांच्या नेत्याला दिले आहे. ‘कोणत्याही विषयावर सखोल विचार करणारा, उच्चशिक्षित, रणनीतीकार’, असेही त्यांनी राहुल गांधी यांना संबोधले आहे. सॅम म्हणून ओळखले जाणारे सत्यनारायण पित्रोदा हे भारताच्या दक्षिण आणि ईशान्य भागातील लोकांविषयी केलेल्या वर्णद्वेषी टिप्पण्यांसाठी अन् वर्ष १९८४ मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या शिखांच्या भयानक नरसंहाराला ‘हुवा तो हुवा’, असे सांगून सहजपणे फेटाळून लावण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. निवडणुकीच्या कालावधीत काही काळासाठी निलंबनाचा सामना केल्यानंतर पित्रोदा केवळ त्यांच्या पूर्वीच्या पदावर परतलेच नाहीत, तर ते राहुल गांधींचे पालकत्वही घेत आहेत. उघड खोटे बोलून आणि आपल्या जुन्या मित्राच्या मुलाला लोकशाही कमकुवत करण्याच्या नवनव्या धोरणांविषयी प्रशिक्षण देऊन भारतातील परिस्थितीचे चुकीचे चित्रण करण्याची कला त्यांनी आत्मसात केली आहे. राहुल गांधींचा ‘पप्पू’ ते ‘कठपुतली’ हा प्रवास, म्हणजे विभाजनवादी राजकारणाच्या आगीशी खेळण्याविना दुसरे काही नाही. ही पद्धत आपल्या लोकशाहीला अनेक प्रकारे धोका निर्माण करते.

प्रफुल्ल केतकर

२. भारताच्या विरोधात नकारात्मकता पसरवण्याचे राहुल गांधी यांचे धोरण

आतापर्यंत राहुल यांनी दक्षिणेकडील राज्यांमधून निवडणूक लढवतांना उत्तरेच्या विरोधात बोलणे, विविध कायद्यांविषयी चुकीची माहिती पसरवणे, निवडणूक आयोगापासून ते न्यायव्यवस्थेपर्यंत घटनात्मक संस्थांना लक्ष्य करणे आणि भारतीय हद्दीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निराधार आरोप करणे, हा शिकवलेला खेळ खेळला आहे. पंतप्रधान मोदींवर शिवीगाळ आणि आक्रमण केल्यानंतर त्यांना, ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाही’, अशीही रडण्याची सवय झाली आहे. आधीच्या दौर्‍यांमध्ये राहुल गांधी यांनी भारताविषयी नकारात्मकता पसरवण्यासाठी विदेशी दौर्‍यांची निवड केली होती. त्यांच्या अलीकडील अमेरिका दौर्‍यात त्यांनी जे केले, तो सर्वांत धोकादायक खेळ आहे. त्यांच्या गुरूंनी (पित्रोदा यांनी) शिकवलेल्या भारतीय लोकशाहीला अल्प लेखण्याच्या आणि मानहानी करण्याच्या धड्यात ते उत्तीर्ण झाले असल्याची चिन्हे दर्शवत आहे. विभाजनाच्या राजकारणाच्या आगीमध्ये ही पद्धत आपल्या लोकशाहीला अनेक प्रकारे धोका निर्माण करत आहे.

३. राहुल गांधी यांना भारताच्या शत्रूराष्ट्र चीनचा पुळका !

रोजगार आणि संधी या आघाड्यांवर राहुल गांधी यांनी चीनच्या बाजूने बोलणे निवडले आणि तेथे ‘बेरोजगारी नाही’ असा दावा केला. आतापर्यंतच्या गलवान चकमकीपासून चीनसाठी बोलण्याची एकही संधी त्यांनी गमावली नाही. याउलट सर्व आंतरराष्ट्रीय संस्था भारताला सकारात्मक दृष्टीकोनातून, जागतिक अर्थव्यवस्थेतील एक उज्ज्वल बिंदू म्हणून दाखवत आहेत. अलीकडच्या काळात बांधकाम आणि रोजगार यांच्या परिस्थितीतील संकटांचा चीनने एका अहवालाद्वारे स्वीकार केला आहे, तेव्हा राहुल आणि त्यांचा पक्ष काँग्रेस यांचे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी असलेल्या संबंधामध्ये इतके विशेष काय आहे ? जर त्यांना लोकशाहीची इतकीच चिंता असेल, तर काँग्रेस आणि चीनमधील कम्युनिस्ट पक्ष यांच्यातील द्विदलीय कराराविषयी ते स्पष्टीकरण का देत नाहीत ? आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतातील किंवा विदेशी भूमीवरील कोणत्याही प्रसारमाध्यमांनी त्यांना याविषयी विचारले नाही. चीन भारताला रणनीतिक दृष्टीने घेरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतांना आपल्या विरोधी पक्षाच्या नेत्याला शत्रूविषयी विशेष प्रेम असण्याचे कारण काय आहे ?

४. राहुल गांधी यांच्याकडून विदेशी भूमीवर भारतातील शिखांविषयी अपप्रचार

जगभरात डाव्या-इस्लामी गटाने उदारमतवादी जागा कह्यात घेतली आहे आणि लोकशाही संस्था अन् प्रक्रिया यांविषयी शंका निर्माण केल्या आहेत. अचानक सर्वत्र निवडणुका अन्यायकारक ठरल्या आहेत. विदेशी संस्था आणि विचारवंत भारताला लक्ष्य करण्यासाठी संधी शोधत आहेत. विदेशी भूमीवर भारताच्या निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यामागचे तर्कशास्त्र काय आहे ? आणि असे करून राहुल गांधी कुणाला साहाय्य करत आहे?

व्हर्जिनियाच्या हर्नडन येथील ‘डायस्पोरा’ (मातृभूमीपासून दूर जाऊन इतर देशांमध्ये स्थायिक झालेले भारतीय) समुदायाच्या कार्यक्रमात त्यांनी केलेली टिप्पणी सर्वांत क्रूर आणि निर्लज्ज होती. ते म्हणाले, ‘‘ही लढाई (भारतात) शिखांना पगडी घालण्याची अनुमती दिली जाईल कि नाही, तसेच त्यांना कडे घालण्याची किंवा गुरुद्वारात जाण्याची अनुमती दिली जाईल कि नाही, याविषयी आहे.’’ याहून मोठा खोटारडेपणा असू शकतो का ? जर फाळणीनंतर या देशात शिखांना लक्ष्य करण्यात आले, तर मग काँग्रेसच्या राजवटीत श्रीमती गांधींची हत्या झाली होती, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यावेळी ३ सहस्रांहून अधिक शिखांची निर्घृणपणे कत्तल करण्यात आली, ज्याचे समर्थन राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांनी, ‘जेव्हा मोठे झाड पडते, तेव्हा पृथ्वी थोडी हलते’, अशा प्रकारे केले होते. या प्रकरणातील प्रमुख आरोपी हे काँग्रेसचे नेते होते आणि त्यांना वाचवण्यासाठी काँग्रेस सरकारने कोणतीही कसर सोडली नाही.

५. राहुल गांधी यांच्याकडून खलिस्तानी आतंकवाद्याच्या भूमिकेचे समर्थन

पंतप्रधान मोदी यांनी स्वतः पगडी परिधान करून शीख तीर्थक्षेत्रांची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रयत्न केले, कर्तारपूर साहिब गुरुद्वारामध्ये प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न केले, तसेच सर्व प्रकाश पर्व राष्ट्रीय सण म्हणून साजरे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने श्री गुरुनानक देवजी यांचे ५५० वे प्रकाश पर्वही साजरे केले आणि ‘महान गुरूंनी दाखवलेल्या सामाजिक उन्नतीच्या आणि स्वयंमुक्तीच्या मार्गाचा आदर म्हणून हा प्रसंग सहकार्याने  अन् समन्वयाने साजरा करावा’, असे आवाहन केले. ही तथ्ये जाणून घेतल्यानंतरही राहुल यांनी पन्नूसारख्या खलिस्तानी आतंकवाद्याच्या भूमिकेचे समर्थन केले. काँग्रेस आणि गांधी कुटुंब यांना वर्ष १९८४ च्या पापातून मुक्त करण्यासाठी विदेशातून काम करणार्‍या आतंकवादी गटांशी केलेला हा एकतर्फी करार आहे का ?

६. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा द्वेष करणारे काँग्रेसचे जवाहरलाल नेहरू ते राहुल गांधी !

गांधी कुटुंबाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेला द्वेष समजण्यासारखा आहे. संस्कृतीची मूल्ये रुजवण्यासाठी समर्पित असलेल्या या राष्ट्रीय संघटनेला चिरडण्यासाठी नेहरूंच्या काळापासून संपूर्ण सत्तेचा वापर केला गेला. भारताची अंतर्निहित एकता लक्षात घेऊन विविधतेचा उत्सव साजरा करण्यावर मूलतः विश्वास ठेवणार्‍या हिंदुत्वनिष्ठ शाखेने ब्रिटीश धोरणे चालू ठेवण्याच्या वसाहतवादी रचना आणि घराणेशाही यांच्या प्रयत्नांना एकट्याने आव्हान दिले अन् नाकारले. कुणाशीही वैर न बाळगता आपल्या प्राचीन राष्ट्रीयत्व आणि सार्वभौम बंधुत्व यांवर विश्वास ठेवणार्‍या वचनबद्ध स्वयंसेवकांचा एक महत्त्वाचा समूह सिद्ध केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी राहुल गांधी यांची वक्तव्ये हा आणखी एक निर्लज्ज खोटारडेपणा आहे. स्वातंत्र्याच्या वेळी तत्कालीन सरसंघचालक पू. गोळवलकरगुरुजी यांनी ‘सर्व भारतीय भाषा राष्ट्रभाषा’ असल्याची अभिमानाने घोषणा केली होती. वर्ष १९६५ मध्ये जेव्हा काँग्रेस सरकार त्यांच्या संदिग्ध धोरणांमुळे भाषिक फुटीरतावादाच्या आव्हानाला तोंड देत होते, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाषा धोरणावर एक ठराव संमत केला. त्यात ‘भारतातील सर्व भाषा राष्ट्रीय आहेत आणि त्यांना समान दर्जा दिला जावा. केंद्रामध्ये अधिकृत भाषा म्हणून हिंदी आणि त्यांच्या संबंधित राज्यांमध्ये इतर प्रादेशिक भाषा वापरल्या जाव्यात’, असे म्हटले होते. (अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १९६५). वर्ष २०१५ मध्ये ‘अखिल भारतीय प्रतिनिधी सभा’ या संघटनेतील निर्णय घेणार्‍या सर्वोच्च संस्थेने मातृभाषेत शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, सांस्कृतिक पायाभरणी समृद्ध करण्यासाठी, विशेषतः प्राथमिक शिक्षण मातृभाषेत किंवा आपल्या राज्यघटनेतील मान्यताप्राप्त राज्य भाषांमध्ये असावे’, असा ठराव संमत केला. वर्ष २०१८ मध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने सर्व भारतीय भाषांचे संरक्षण आणि प्रचार करण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले होते.

७. काँग्रेस आणि मित्रपक्ष यांचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला विरोध

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’, हा भारतीय भाषांमध्ये सर्व शैक्षणिक शाखा चालू करण्याचा पहिला प्रयत्न आहे, ज्याला काँग्रेस आणि त्यांच्या प्रादेशिक मित्रपक्ष यांनी विरोध करण्यासाठी निवडले. कन्नड, तमिळ आणि बंगाली या पहिल्या भाषा होत्या, ज्यामध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रम चालू करण्यात आला. येथे एक भाषा लादण्याचा प्रश्नच कुठे आहे? विविधता ही आपल्या संस्कृतीची सर्वांत मोठी शक्ती आहे, जी साजरी केली गेली पाहिजे, याचा उल्लेख केल्याविना संघाचे कोणतेही पदाधिकारी भाषण किंवा प्रवचन देत नाहीत. जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकतेविषयी बोलतो, तेव्हा त्या अर्थानेच डॉ. आंबेडकरांनी संविधान सभेत उल्लेख केला होता. कोणतीही ओळख, मग ती जातीय असो, भाषिक असो, पंथीय असो, आपल्या राष्ट्रीय अस्मितेहून वरचढ नसावी, तसेच राष्ट्राच्या एकतेची आणि अखंडतेची किंमत मोजणारी नसावी, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा साधा मंत्र आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही कल्पना चुकीच्या पद्धतीने मांडल्यामुळे राहुल गांधी यांना खोटे समाधान आणि काही मते मिळू शकतात; परंतु देशाला त्याची किंमत मोजावी लागेल.

८. जगाच्या अस्थिर राजकीय परिस्थितीत राहुल गांधी यांची भूमिका धोकादायक !

अनेक ओळखींनी विखुरलेल्या देशावर आपण किंवा आपला पक्ष शत्रूत्वाने राज्य करू शकू, असे राहुल गांधी यांना वाटते का ? एका जातीला, प्रदेशाला किंवा धर्माला एकमेकांविरुद्ध उभे करण्याच्या या धोकादायक विभाजनकारी राजकारणामुळे राहुल गांधींनी त्यांची आजी आणि वडील गमावले, तरीही त्याच मार्गावर चालल्याविषयी त्यांना पश्चात्ताप होत नाही. सर्वांत वाईट गोष्ट, म्हणजे ते आता भारताबाहेरील लिपित लिहिलेल्या भाषेचे अनुसरण करत आहेत. बांगलादेशापासून ब्राझीलपर्यंत सर्व निवडणुका अन्वेषणाखाली आहेत. भारतविरोधी शक्ती त्यांचे हित साधण्यासाठी पुन्हा व्यवस्था कह्यात घेण्याचा विचार करत आहेत. अस्थिर जागतिक परिस्थितीत राष्ट्रीय सहमतीची आवश्यकता असतांना भारताचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी कोणीतरी शिकवलेल्या उघड खोटेपणामुळे भारतीय लोकशाहीसाठी एक मोठा धोका निर्माण करत आहेत.’

– लेखक : प्रफुल्ल केतकर, संपादक, साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’

(साभार : साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’)

संपादकीय भूमिका

सातत्याने देशविरोधी भूमिका घेऊन भारताची हानी करणार्‍या राहुल गांधी यांचा नागरिकांना अजूनही पुळका का ?