वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या पबना जिल्ह्यातील सुजानगर उपजिल्हातील ‘ऋषीपारा बारवारी पूजा मंडप’ आणि ‘माणिकादी पालपारा बारवारी पूजा मंडप’ येथे हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. ऋषीपारा मंडपात ४, तर माणिकडी मंडपात ५ मूर्ती फोडण्यात आल्या. या घटनेमुळे येथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. बांगलादेशी सुरक्षायंत्रणा आणि स्थानिक प्रशासन यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी त्यांनी मागणी केली आहे. विशेष म्हणजे वारंवार दूरभाष करूनही घटनेच्या वेळी पोलीस पोचले नाहीत. घटनेनंतर पोलीस आणि अन्य सुरक्षायंत्रणा पोचल्या.
बांगलादेशात सुजानगर उपजिल्हामधील ५१ मंदिरांमध्ये दुर्गापूजा उत्सव साजरा केला जाणार आहे; मात्र या घटनेमुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुजानगर उपजिल्हा कार्यकारी अधिकारी महंमद रशीदुझ्झमान यांनी सांगितले की, दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. प्रत्येक मंदिराच्या सुरक्षेसाठी स्थानिक लोकांची एक समितीही स्थापन करण्यात आली आहे.
किशोरगंजमध्येही मूर्तींची तोडफोड
ढाका विभागातील किशोरगंज येथील गोपीनाथ जिउर आखाडा दुर्गा पूजा मंडपात हिंदूंच्या देवतांच्या ७ मूर्तींची तोडफोड करण्यात आली. मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले रक्षक झोपलेले असतांना ही घटना घडली. जिहाद्यांनी भिंत पाडली आणि मूर्तींचे शिर तोडले. या तोडफोडीच्या निषेधार्थ हिंदूंनी त्याच दिवशी निषेध मोर्चा काढला. ‘दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल’, असे आश्वासन जिल्हा आयुक्त फौजिया खान आणि पोलिस अधीक्षक महंमद हसन चौधरी यांनी हिंदूंना दिले.
जिल्हा पूजा उत्सव समितीचे अध्यक्ष नारायण दत्ता प्रदीप यांनी सांगितले की, या तोडफोडीमुळे हिंदू अत्यंत दु:खी आहेत. सध्या येथेे भीतीचे वातावरण आहे. अशाच घटना होत राहिल्या, तर आम्ही धार्मिक सण कसे साजरे करणार?
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आयुक्त फौजिया खान यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक बोलावण्यात आली. त्यात वरिष्ठ पोलीस, सैन्य आणि धडक कृती दल यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत हिंदूंच्या नेत्यांनी दोषींना अटक करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
संपादकीय भूमिकाभारतात एखाद्या मशिदीवर चुकून जरी कुणी दगड भिरकावला, तर जगातील इस्लामी देश थयथयाट करतात; मात्र बांगलादेशात हिंदूंच्या संदर्भात अशा घटना वारंवार घडत असतांनाही सारे काही शांत आहे ! |