व्यायाम करण्याचा कंटाळा येत आहे का ? मग हे करा !
(भाग १४)
भाग १३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/838038.html
बरेच लोक नियमितपणे व्यायाम करतात; पण त्यात विविधता नसल्यामुळे त्यांना शरिराच्या सर्वांगीण प्रगतीचा लाभ मिळत नाही, उदा. काही जण प्रतिदिन ३० मिनिटे चालतात, तर काही जण केवळ सूर्यनमस्कार करतात आणि काही जण ठराविक आसने करतात. हे सर्व व्यायाम प्रकार लाभदायक असले, तरी त्याचा परिणाम शरिराच्या केवळ एका भागावरच होतो. या लोकांना व्यायामाचा लाभ मिळतो; मात्र एकाच प्रकारचा व्यायाम केल्याने शारीरिक बळ, लवचिकता आणि सहनशक्ती यांचा समतोल साधला जात नाही. याचे कारण, म्हणजे त्या व्यायाम प्रकारांत केवळ काहीच स्नायूंचा वापर केला जातो. त्यामुळे शरिराच्या इतर भागांवर योग्य ताण येत नाही. परिणामी त्यांच्या शरिराचा पूर्णपणे विकास होत नाही. त्यामुळे ते नियमितपणे व्यायाम करत असले, तरीही ते संपूर्ण सक्षम आणि निरोगी नसतात. शारीरिक स्वास्थ्य हे केवळ एका प्रकारच्या व्यायामावर अवलंबून नसते. त्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करणे आवश्यक आहे, उदा.
१. हृदय आणि फुप्फुसे यांची क्षमता वाढवणारे प्रकार : कार्डिओ, उदा. चालणे, धावणे, सायकल चालवणे इत्यादी.
२. स्नायूंची शक्ती वाढवणारे प्रकार : दंड, बैठक, वजन उचलून व्यायाम करणे इत्यादी.
३. शरिराची लवचिकता वाढवणारे प्रकार : योगासने, ‘स्ट्रेचिंग’चे प्रकार इत्यादी.
४. तोल सुधारण्यासाठीचे प्रकार : सरळ रेषेवर चालणे, ताडासन, वृक्षासन इत्यादी.
विविध प्रकारचे व्यायाम केल्याने शरिरातील वेगवेगळ्या स्नायूंचा वापर होतो आणि एकाच स्नायूवर सतत ताण न येता शरिराची शक्ती, लवचिकता, सहनशक्ती, हृदय फुप्फुसे यांची कार्यक्षमता हे सर्व घटक संतुलितपणे सुधारतात, तसेच विविधता आणल्यामुळे व्यायामाचा कंटाळा येत नाही; कारण प्रत्येक व्यायाम प्रकारात नावीन्य असते. त्यामुळे सूर्यनमस्कार, सोपी आसने, प्राणायाम, पळणे, खेळणे, शक्ती वाढवण्याचे प्रकार, तोल सुधारण्यासाठीचे प्रकार इत्यादी वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांचा व्यायामाच्या सत्रात समावेश करावा, जेणेकरून तोच तोच प्रकार करून कंटाळा येणार नाही आणि विविध प्रकार केल्याने शरिराची सर्वांगीण प्रगतीही होईल.’ (११.८.२०२४)
– सौ. अक्षता रूपेश रेडकर, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा.
भाग १५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/840511.html
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise