श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधिकेला चुकांची कठोरतेने जाणीव करून दिल्यावर तिचे झालेले चिंतन आणि तिने अंतरंगात अनुभवलेले परिवर्तन !

‘संत कधी कधी साधकांना त्यांच्या चुकांची कठोरतेने जाणीव करून देतात. त्या वेळी ते त्या साधकाला केवळ जाणीव करून देत नाहीत, तर त्यांचे चैतन्य आणि संकल्प यांमुळे साधकाच्या अंतरंगात परिवर्तन होत असते. या संदर्भात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी चुकीविषयी कठोरतेने जाणीव करून दिल्यावर मनातील अनावश्यक विचार न्यून होऊन मन मोकळे होणे

‘मनाप्रमाणे करणे’ या अहंच्या पैलूमुळे माझ्याकडून एक चूक २ – ३ वेळा झाली. त्याविषयी मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी कठोरतेने जाणीव करून दिली. तेव्हा आरंभी मी सुन्न झाले आणि नंतर मला रडू आले. याविषयी चिंतन केल्यावर माझ्या लक्षात आले की, त्या कालावधीत अनावश्यक विचार वाढल्याने माझे मन साधनेकडे पूर्णपणे केंद्रित होत नव्हते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ रागावल्यावर अकस्मात् २ – ३ दिवसांनी माझ्या मनातील अनावश्यक विचार आपोआप न्यून होऊन साधनेचे विचार आणि भावाचे प्रयत्न करणे, यांचे प्रमाण वाढले. ‘मनाच्या स्तरावरील एखादी टणक गाठ सुटून आता माझे मन मोकळे झाले आहे’, असे मला जाणवले.

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी चुका अन्य साधिकेसमोर सांगितल्यामुळे मनात नकारात्मक विचार येणे आणि त्यांनी माझ्यासाठी आतापर्यंत काय केले, ते लिहून काढल्यावर सकारात्मकता निर्माण होणे

दुसर्‍या प्रसंगात माझ्या समष्टी साधनेच्या दृष्टीने झालेल्या काही चुका श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला एका साधिकेच्या समोर सांगितल्या. त्या वेळी मला त्याचा त्रास झाला आणि मी पुष्कळ रडले. माझ्या मनात स्वतःविषयी नकारात्मक विचार आले. याविषयी मी लगेच माझे वडील पू. अशोक पात्रीकर यांच्याशी बोलले. त्यांनी मला ‘या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवे ?’, याचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी माझ्यासाठी आतापर्यंत काय काय केले आहे’, हे मी लिहून काढले. ते लिहिल्यावर माझ्या मनात साधनेच्या प्रयत्नांबाबत सकारात्मक विचार येऊन मला पुष्कळ आनंद जाणवू लागला.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने दोन्ही प्रसंगांविषयी झालेले चिंतन 

अ. पहिल्या प्रसंगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ मला रागावल्यावर ‘त्यांचे चैतन्य माझ्या मनोमय कोषापर्यंत गेल्यामुळे माझे मन मोकळे झाले’, असे जाणवले.

आ. दुसर्‍या प्रसंगात अन्य साधिकेसमोर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी माझ्या चुका सांगितल्यावर माझा अहंकार दुखावला गेला. त्यामुळे त्या प्रसंगात मला अधिक त्रास झाला; परंतु त्याच वेळी ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे चैतन्य माझ्या महाकारण देहापर्यंत (अहंच्या कवचापर्यंत) गेले’, असे मला जाणवले. त्यामुळे पू. बाबांचे साहाय्य घेऊन ‘या प्रसंगातून लवकर बाहेर पडावे’, ही प्रेरणा मला मिळाली आणि तटस्थपणे स्वतःच्या चुकांविषयीचे चिंतनही करता आले. हे चिंतन करत असतांना ‘संतांची आपल्यावर केवढी कृपा आहे’, हे मला जाणवले आणि माझी भावजागृती होऊन आंतरिक आनंद अनुभवता आला.

माझ्यावर आपलेपणाने रागावून मला साधनेत पुढे जाण्यासाठी साहाय्य करणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि वेळोवेळी साधनेसाठी कृतीप्रवण करणारे पू. बाबा (पू. अशोक पात्रीकर) यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४६ वर्षे), फोंडा, गोवा. (१६.३.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक