इस्रायलने २८ सप्टेंबर या दिवशी लेबेनॉनवर हवाई आक्रमणे करून हिजबुल्लाचे मुख्यालय उद़्ध्वस्त केले आणि त्याचा प्रमुख हसन नसरूल्ला याला ठार मारले. अमेरिकेने जसे ओसामा बिन लादेन याला ठार मारले होते, त्याप्रमाणेच इस्रायलने केलेली ही मोठी कामगिरी आहे. इस्रायलने हिजबुल्ला आतंकवादी गटाच्या प्रमुखाला बंकरमध्येच संपवल्याने जगातील एका मोठ्या आतंकवादी गटाचे कंबरडे मोडले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्या भूमीवर हिजबुल्ला पोसले गेले आहे, त्या लेबेनॉनच्या नागरिकांना ‘हिजबुल्लाच्या आतंकवाद्यांना साहाय्य करू नये’, अशी चेतावणी दिली आहे. हिजबुल्लाला संपवल्यानंतरही इस्रायलने लेबेनॉनवरील आक्रमणे चालूच ठेवली आहेत. लेबेनॉनचे सरकार निष्क्रीय झाल्याप्रमाणे स्थिती झाली आहे. यामुळे लेबेनॉनचे नागरिक तेथून २० कि.मी.वर असलेल्या सीरिया देशात आश्रय घेण्यासाठी जात असल्याचे वृत्त आहे. इस्रायलने हिजबुल्लाचे एक एक कमांडर टिपून मारले. कुठल्या इमारतीच्या तळघरात हिजबुल्लाचे नेते लपले आहेत, ते इस्रायलला अचूकपणे कळत आहे. यामध्ये त्यांच्या गुप्तचर यंत्रणेने जशी मोठी कामगिरी बजावली, तशीच इराणमधील काही लोक त्यांना मिळाले असल्याची शंका आता व्यक्त केली जात आहे; कारण इस्रायलने हिजबुल्लाचे जे कमांडर संपवले, ते काही ना काही कारणाने इराणच्या संपर्कात आले होते. नसरूल्ला याचा जखम न झालेला मृतदेह सापडल्याने आता त्याच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे. इस्रायलची गाझा पट्टीवर आक्रमणे चालू असतांना हिजबुल्लाने इस्रायलवर आक्रमण केले होते. हिजबुल्लाला संपवून इस्रायल थांबले नाही, तर ‘लेबेनॉनच्या कोणत्याही भागांत इस्रायल कधीही पोचू शकते’, असे त्याने थेट सांगितले आहे. इस्रायलचा आतंकवादाच्या विरोधातील अविरत चालू असलेला लढा उग्र रूप धारण करत असतांना भारतात मात्र जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांध नागरिकांनी नसरूल्ला याला ठार केल्याच्या निषेधार्थ मोर्चे काढून घोषणा दिल्या. ही अत्यंत गंभीर, राष्ट्रघातकी आणि चिंताजनक गोष्ट आहे.
धर्मांध काश्मिरींचे हिजबुल्लाप्रेम नष्ट करा !
या युद्धाचा भारताशी थेट काहीही संबंध नसतांना काश्मीरमधील बडगाममध्ये मात्र निषेध मोर्चा काढण्यात आला. काश्मिरींनी काढलेल्या या मोर्चामध्ये तरुण, विद्यार्थी आणि महिला यांचा मोठा भरणा होता. ते सर्व मोठ्याने घोषणा देत होते. यात सहभागी तरुण मुसलमान विद्यार्थी-विद्यार्थिनींना कुणीतरी भडकावत आहे, हे उघड आहे; कारण लांबच्या देशातील आतंकवाद्यासाठी असे मोर्चे काढायचे कळणे, त्याचे नियोजन होणे, आतंकवाद्याविषयी प्रेम व्यक्त करणारे संभाषण विद्यार्थ्यांनी करणे, त्यांच्यासाठी जोरदार घोषणा देणे, हे विद्यार्थी स्वयंप्रेरणेतून करण्याची शक्यता नाही. हे नियोजनबद्ध आहे, यात शंकाच नाही. म्हणूनच ‘टूलकीट’प्रमाणे हाही भारतविरोधी आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचा (इकोसिस्टमचा) भाग आहे, असे म्हणण्यास मोठा वाव आहे. ‘सैनिकांवर दगडफेक करणार्यांचेच हे पाठीराखे आहेत’, असे म्हटले तर चूक नव्हे. अशी आतंकवादप्रेमी जनता येथे घडवली गेली आहे, निर्माण झाली आहे; म्हणूनच पीडीपीच्या (पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या) नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्यासारख्यांचे फावते आहे. या सर्व हमास किंवा हिजबुल्ला प्रेमी काश्मिरी नागरिकांना ‘त्यांचे हित कशात आहे ?’, हे निक्षून आणि अत्यंत कठोर शब्दांत समजावायला हवे. यांचे दूषित मूळ नष्ट झाल्याविना त्यांच्यात वैचारिक परिवर्तन कसे होणार ? यांतील किती जणांना ‘आतंकवादाला पाठिंबा देणे, म्हणजे आतंकवाद जोपासणे’ हे कळत आहे ? याची कल्पना नाही; परंतु यात ‘प्रत्येक घरातून हिजबुल्ला निर्माण होईल’, अशीही घोषणा देण्याइतपत त्यांच्यात द्वेष भरवणारे किती प्रचंड भारतद्वेषी असतील, याची कल्पना येेते. दगडफेक करणार्यांचे आर्थिक स्रोत बंद झाल्यावर दगडफेक करण्याचे प्रकार बंद झाले, तसे आतंकवादीप्रेमी झालेल्या काश्मिरी जनतेवरही काही उपाय निश्चितपणे काढावा लागणार आहे. आतंकवादप्रेमींना आणि आतंकवाद पोसणार्यांना साम, दाम, दंड, भेद यांप्रमाणे वागणूक द्यावीच लागणार आहे; कारण यातूनच भारतातील ‘स्लिपर सेल’ (आतंकवाद्यांना साहाय्य करणारी छुपी देशांतर्गत यंत्रणा) निर्माण होत आहे. भारतातील आतंकवाद स्थानिक आतंकवादप्रेमींवरच पोसला जातो. त्यामुळे उद्या याच मोर्चेकर्यांतून मोठा आतंकवादी निर्माण होण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या चुकीचे गांभीर्य निक्षून सांगणे आणि त्यांना दंडित करणे, यांसाठी भारतियांनी शासनाला भाग पाडले पाहिजे. समाजात त्यांची ‘राष्ट्रघातकी’ म्हणून छी थू झाल्याविना ते सुधारणार नाहीत.
राष्ट्रद्रोही मेहबुबा मुफ्तींवर कारवाई करा !
आजही काश्मीरमध्ये आतंकवादी आणि सैन्य यांच्यात चकमकी चालू असून त्यात सैनिकांचेही प्राण जात आहेत. २९ सप्टेंबरलाही आतंकवाद्याला कंठस्नान घालण्यात आले; पण मेहबूबा मुफ्ती यांच्यासारख्यांना सैनिकांच्या प्राणांचे मोल काय असणार ? ‘मेहबूबा मुफ्ती त्यांचे आतंकवादप्रेम उघडपणे व्यक्त करत असतील, तर त्यांच्यावर कारवाई का होऊ नये ?’, असाही प्रश्न पडतो. मुफ्तीबाईंनी बांगलादेशामधील हिंदूंवरील अत्याचारांविषयी अवाक्षरही काढले नाही आणि लेबेनॉनमधील हिजबुल्लाचा प्रमुख नसरूल्ला ठार झाला, तर त्यांनी त्यांचे भाषण थांबवले, निषेध व्यक्त केला. आतंकवाद्यांना एवढा आक्रमक पाठिंबा देणार्यांना ‘राष्ट्रविरोधी’ संबोधले गेले पाहिजे. त्या काश्मीरमध्ये त्यांच्यासमोरच आतंकवादाशी लढणार्या आणि त्यासाठी प्राणार्पण करणार्या भारतीय सैन्याच्या विरोधात, म्हणजेच देशाच्या विरोधात उघडपणे वागत आहेत. त्यांच्या आतंकवादप्रेमाविषयी माध्यमे त्यांना जाब का विचारत नाहीत ? शासन त्यांच्यावर कारवाई का करत नाही ?
बाटला हाऊस चकमक, महंमद अफझल, बुरहान वानी, इशरत जहां, कसाब आणि गाझा अन् हिजबुल्ला प्रेमी या सर्वांवर प्रेमाची फुंकर घालणारे भारतातील अन्यही मेहबूबा मुफ्ती यांच्यासारखेच राष्ट्रविरोधी आहेत. योगायोग असा की, परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी ‘पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर रिकामे करायला लावणार’, अशी घोषणा अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केली आहे. त्यांचे हे लक्ष्य असेल, तर त्यांना प्रथम काश्मीरमधील या पाकप्रेमींना आवरून त्यांचा समाचार घ्यावा लागेल; अन्यथा त्यांचे लक्ष्य साध्य करण्यात हे लोक मोठा अडथळा बनतील ! भारतानेही इस्रायलसारखाच कणखरपणा दाखवून आंतर्बाह्य देशविरोधी प्रवृत्तींना संपवण्याचा विडा उचलायला हवा !
भारताने आतंकवादप्रेमींवर साम, दाम, दंड, भेद अशी कारवाई चालू केली, तरच येथे शांतता नांदेल ! |