विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !

विरोधकांनी विद्यार्थ्यांवरील लाठीमारावर चर्चा करण्याची केली होती मागणी

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

नवी देहली – संसदेत २७ जुलै या दिवशी परीक्षा सुधारणा विधेयकावर होणारी चर्चा विरोधी पक्षांच्या खासदारांनी घातलेल्या गदारोळामुळ होऊ शकली नाही. विरोधकांची मागणी होती की, जंतरमंतर येथे, तसेच बिहारच्या सीवान येथे कथित विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या, तसेच गोळीबाराच्या घटनेवर चर्चा करण्यात यावी. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी खासदारांना सांगितले, ‘मी सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळ देतो. सरकार आणि विरोधी खासदार यांनी याविषयावर चर्चा करून विषय मांडावा.’ मात्र या विषयावर सहमती झाली नाही. त्यापूर्वी लोकसभा आधी दुपारी १२ वाजेपर्यंत, नंतर २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली. राज्यसभेचीही अशीच स्थिती होती. येथेही सभागृह २ वेळा स्थगित करण्यात आले आहे. नंतर सायंकाळी ५.१५ वाजता ते दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. यापूर्वी सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लोक परीक्षा सुधारणा विधेयक सादर केले.

दुसरीकडे माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिल्यानंतर पहिल्यांदाच संसदेत पोचले. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी त्यांना शाल घालून सन्मानित केले आणि संसद भवनाच्या आतपर्यंत घेऊन गेले.

संपादकीय भूमिका

  • संसदेचे कामकाज चालवण्यासाठी प्रत्येक मिनिटावर अनुमाने पावणे तीन लाख रुपये खर्च केले जात असतांना अशा प्रकारचा गदारोळ घालून जनतेचे कोट्यवधी रुपये वाया घालणार्‍यांकडून ते वसूल करण्यासह त्यांची खासदारकही रहित केली पाहिजे !
  • यावरून विरोधकांना विद्यार्थ्यांविषयी आणि प्रश्नपत्रिका फुटीविषयी कोणतेही स्वारस्य नसून केवळ सरकारला धारेवर धरण्यासाठीच ते या सूत्राचा वापर करत आहे, हे स्पष्ट होते !