केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक

वारसाहक्काच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी

प्रतिकात्मक छायाचित्र

केपे, २७ जुलै (वार्ता.) – केपे तालुक्यात बाळ्ळी-अडणे येथील भूमीच्या व्यवहारामध्ये दिशाभूल करून अनुमाने ५५ लाख ७८ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी केपे पोलिसांनी मन्सूर शेख आणि अन्य अज्ञात व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. देऊळवाडा-बाळ्ळी येथील सूरज बाळ्ळीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सूरज बाळ्ळीकर यांच्या तक्रारीनुसार ११ ऑक्टोबर २०२१ ते ४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत संशयितांनी बाळ्ळीतील अडणे परिसरातील स्थावर मालमत्तेचा व्यवहार करतांना सबंधित मालमत्तेच्या सर्व वारसाहक्काच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे सांगून तक्रारदार आणि त्याचे कुटुंबीय यांना गुंतवणूक करण्यात प्रवृत्त केले. त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून सूरज बाळ्ळीकर यांनी ५० लाख ४७ सहस्र ५०० रुपये आणि त्यांच्या बहिणीने ५ लाख ३१ सहस्र ८४ रुपये रकमेची गुंतवणूक केली; मात्र त्यानंतर २७ फेब्रुवारी २०२५ या दिवशीच्या वारसाहक्काच्या दस्तऐवजामध्ये कायदेशीर वारसांचा समावेश नसल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे हक्कसोड पत्र (रिलीज डीड), नेमणूक करार (असाईनमेंट डीड), मुख्यत्यार पत्र (पावर ऑफ ॲटर्नी) आणि इतर मालकी हक्काशी संबंधित संशयास्पद अन् बनावट कागदपत्रांचा वापर विशेष दिवाणी खटल्यात करण्यात आला, असा आरोप सूरज बाळ्ळीकर यांनी केला आहे. संशयितांनी या कागदपत्रांच्या प्रती व्हॉट्सॲपद्वारे पाठवल्या; मात्र मूळ कागदपत्रे दाखवण्यास नकार दिला, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे महत्त्वाची माहिती लपवून ठेवून सूरज बाळ्ळीकर यांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी केपे पोलिसांनी मन्सूर शेख आणि इतर अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक दीपा देईकर पुढील अन्वेषण करत आहेत.