वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !

भारत बनले जागतिक वैद्यकीय पर्यटनाचे केंद्र !

(वैद्यकीय पर्यटन म्हणजे मेडिकल टूरिझम. याचा अर्थ वैद्यकीय उपचार घेण्यासाठी विदेशातून लोकांनी अमुक देशात जाण्याची प्रक्रिया.)

नवी देहली – भारत आता वैद्यकीय पर्यटनाचे एक मोठे जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे. वर्ष २००९ मध्ये १ लाख १२ सहस्र परदेशी रुग्ण उपचारांसाठी भारतात आले. ही संख्या गेल्या वर्षी ५ लाख ७ सहस्र पर्यंत पोचली. ही वाढ साधारण साडेचार पट आहे. भारताची वैद्यकीय पर्यटनाची बाजारपेठ वर्ष २०२५ मध्ये ८४ सहस्र कोटी रुपयांची होत. पुढील ५ वर्षांत, म्हणजे वर्ष २०३० पर्यंत ती वाढून १ लाख ५६ सहस्र कोटी रुपये, म्हणजे साधारण दुप्पट होईल.

या देशांतील सर्वाधिक रुग्ण येतात भारतात !

बांगलादेश, इराक, उझबेकिस्तान, सोमालिया, ओमान आणि केनिया

भारत ‘वैद्यकीय पर्यटन केंद्र’ बनण्यामागील कारणे अशी…!

१. अल्प दरात वैद्यकीय सुविधा प्राप्त होतात. उदाहरणार्थ अमेरिकेत ज्या उपचारांवर १५ सहस्र रुपये खर्च होतात, तेच उपचार भारतात १ ते २ सहस्र रुपयांमध्ये शक्य आहेत.

२. तज्ञ डॉक्टर्स लवकर उपलब्ध होतात

३. तपासणी अहवाल त्वरित मिळतात

४. उपचारांचा खर्च आधीच निश्चित असतो

५. मोठ्या प्रमाणात रुग्णालयांची उपलब्धता : एका अनुमानानुसार भारतात सर्वाधिक रुग्णालये आहेत. भारतात ही संख्या ६९ सहस्र, तर चीनमध्ये ३९ सहस्र आहे.

६. भारत जगातील १७२ देशांना ई-मेडिकल व्हिसा देतो.

भारतात ६९ सहस्र रुग्णालये !

भारताकडे वैद्यकीय पर्यटन हाताळण्यासाठी मोठी आरोग्य पायाभूत सुविधासुद्धा उपलब्ध आहे. देशात एकूण ६९ सहस्र ३६४ रुग्णालये आहेत. यांपैकी ४३ सहस्र ४८६ खासगी, तर २५ सहस्र ७७८ सरकारी रुग्णालये आहेत. १२ लाख नोंदणीकृत डॉक्टर आहेत.

भारतात विविध प्रकारचे वैद्यकीय व्हिसा उपलब्ध !

परदेशी रुग्णांना सहज भारतात येण्यास सुलभ व्हावे, यासाठी भारत १७२ देशांना ई-मेडिकल व्हिसा देतो. साहाय्यकांसाठी ‘ई-मेडिकल अटेंडंट व्हिसा’ची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येते. एवढेच नव्हे, तर आयुर्वेद, योग, युनानी आणि होमिओपॅथी यांसारख्या भारतीय उपचार पद्धतींनी उपचार घेणार्‍यांसाठी ‘ई-आयुष व्हिसा’ची स्वतंत्र श्रेणी चालू करण्यात आली आहे.