जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !

प.पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे विधान

प.पू. सरसंघचालक मोहनजी भागवत

(जेन-झी म्हणजे वर्ष १९९७ ते २०११ या कालावधीत जन्माला आलेली पिढी. सध्या या पिढीचे वय १५ ते २९ वर्षे आहे.)

भाग्यनगर (तेलंगाणा) – ‘जेन झी’ चांगले असतात. ते अनुकरणप्रिय असतात, भावनिक असतात. ते शांत डोक्याने विचार करत नाहीत. त्यांच्यासमोर असलेले लोक त्यांना प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात केले.

‘एल्.जी.बी.टी.क्यू.’ समुदायाविषयी सहानुभूती बाळगा ! – प.पू. सरसंघचालक

या वेळी प.पू. सरसंघचालकांनी ‘एल्.जी.बी.टी.क्यू.’ समुदायाविषयीही (समलिंगी, उभयलिंगी, तसेच लिंगपरिवर्तन केलेल्या लोकांविषयीही) वक्तव्य केले. ते म्हणाले की, ‘एल्.जी.बी.टी.क्यू.’ यांच्याविषयी कुणीच काही करू शकत नाही, तेसुद्धा यावर काही करू शकत नाहीत. ते तसेच जन्माला आले आहेत. काहीजण मानसिकतेमुळे नंतर तसे झाले. काही शारिरीक आकर्षणामुळे तसे घडले. तेसुद्धा मनुष्य आहेत. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. समाजात त्यांच्यासाठीही एक व्यवस्था आहे. त्यांच्याकडे हीन भावनेतून पाहू नका. शिखंडी एक राजा होता. तो सगळ्या विरांच्या समवेत लढण्यासाठी रणांगणावर गेला होता. त्यामुळे आपल्याकडे याची एक व्यवस्था होती. अशा गोष्टींवर विनाकारण आकांडतांडव न करता शांतपणे त्यांची एक व्यवस्था व्हायला हवी, जेणेकरून समाजाची त्यांच्याविषयी सहानुभूती कायम राहील.

संपादकीय भूमिका

यामुळेच जेन-झी पिढीसमोर योग्य आदर्श निर्माण झाले पाहिजेत. त्यांनी केलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक तरुण-तरुणींची मानसिकता किती विचित्र आणि खालच्या थराला गेली आहे, हे अनेक व्हिडिओतून समोर आले. यामुळे त्यांना योग्य दिशा देणे काळाची आवश्यकता आहे, हे लक्षात घेतले पाहिजे !