जम्मू-काश्मीरच्या विविध भागांमध्ये गेल्या महिन्यात आतंकवादी घटना घडल्या. भारतीय सैन्य त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. दीर्घकाळ आतंकवादग्रस्त असलेले काश्मीर हळूहळू पूर्वपदावर येत असतांनाच ही आतंकवादी आक्रमणे झाली आहेत. काश्मिरी तरुणांचा आतंकवादी कारवायांसाठी वापर करण्याच्या पाकिस्तानच्या डावपेचांमुळे काश्मीरमध्ये हिंसाचार चालू आहे. कलम ३७० रहित (जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम) करतांनाच तिथे शांतता नांदण्यासाठी केंद्राने पावले उचलल्यानंतर त्यांचे चांगले परिणाम दिसत आहेत.
१. आतंकवादी आक्रमणांत वाढ का ?
आतंकवादी आक्रमणांचे प्रमाण न्यून झाले होते आणि आक्रमणे केवळ काश्मीर खोर्यात हिंदु किंवा बाहेरून आलेल्या नागरिकांवर होत होते. दुसरीकडे विकासकामे होत आहेत आणि पर्यटकांचा ओघ अडीच कोटीपर्यंत वाढला आहे. पर्यटकांची वाढलेली संख्या आणि यंदा लोकसभा निवडणुकीत ६० टक्क्यांच्या आसपास झालेले मतदान यांमुळे जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीत सकारात्मक पालट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा समाप्त होऊन ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. तेथे त्रिस्तरीय लोकशाही व्यवस्था राबवली जात आहे. नेमके हेच पाकिस्तानला खुपत असल्याने तिसरे मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी ४ मोठी आक्रमणे घडवून आणली आहेत. जम्मूतील वाढत्या आतंकवादी आक्रमणांचे तेच प्रमुख कारण आहे.
२. सैन्य स्थलांतरित केल्याचा अपलाभ म्हणून पाकिस्तान आतंकवाद पुन्हा पुनरुज्जीवित करत आहे !
पुंछ, राजौरी, सुरनकोट, उधमपूर आणि जम्मू भागांमध्ये २५ हून अधिक आतंकवादी कार्यरत असून ते आक्रमणे करत आहेत. हे सगळे आतंकवादी पाकिस्तानच्या विशेष सैन्याचे सैनिक असावेत. सध्या ६० हून अधिक आतंकवादी सीमेपलीकडे पाकिस्तानी लष्कर आणि ‘आय.एस्.आय.’ या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या निगराणीत दबा धरून बसले आहेत. त्यांना संदेश किंवा आदेश मिळताच ते भारतात घुसून हिंसाचार माजवतील. आतंकवादी संघटनांनी त्यांचे लक्ष काश्मीरकडून जम्मूकडे वळवल्यालाही आता बराच काळ झाला. जम्मूमधील जनजीवन काश्मीर खोर्यापेक्षा अधिक सुरळीत होते.
पुंछ, राजौरीच्या भागामध्ये ‘राष्ट्रीय रायफल’चे ‘व्हिक्टर फोर्स’ तैनात होते, ज्यांची संख्या २५ सहस्रांहून अधिक सैनिक एवढी होती; मात्र या भागात आतंकवाद न्यून झाल्यामुळे आणि चीन सीमेवर अधिक सैनिकांची तैनाती जरुरी असल्यामुळे ‘व्हिक्टर फोर्स’ला येथून स्थलांतरित करून लडाखमध्ये पाठवण्यात आले. याचा लाभ घेऊन काश्मीरमधील आतंकवाद पाकिस्तान पुन्हा पुनरुज्जीवित करत आहे. याखेरीज हा भाग हिंदुबहुल आहे. काश्मीरमध्ये आक्रमणे करण्यापेक्षा जम्मूत ते करणे आपल्या अधिक लाभाचे, तसेच जगाचे लक्ष वेधून घेणारे आहे, हे पाकिस्तानला ठाऊक आहे.
३. लष्करी कारवाई अत्यावश्यक !
आतंकवादाच्या नियंत्रणासाठी लष्करी कारवाई आवश्यक आहे. ‘आतंकवादी जिथून येत आहेत, तिथे जाऊन त्यांचा बंदोबस्त करा’, असा आदेश असल्याने भारतीय सैन्यदलांना मोठीच कारवाई करावी लागेल. मुख्य म्हणजे स्वतःचे दिवस भरत आल्याची जाणीव झाल्याने पाक आतंकवादाला बळ देत आहे; मात्र त्यातून तो स्वतःचीच कबर खोदत आहे, हे कळण्याएवढी समज त्या देशाच्या नेतृत्वाकडे नाही.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.